मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कुरनूर , गुरूवार, 3 मे 2018 (11:25 IST)

पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतःही घेतला गळफास

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख येथे एका तरुण पतीने आपल्या पत्नीसह मुलीची मान पिरगाळून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
  
सतीश बंदीछोडे (वय 32) असे हत्या केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेत पत्नी अंदवा (वय 25) आणि मुलगी वेदिका (वय 3) हे दोघेही मरण पावले आहेत. सतीश हा पुण्यात नोकरीसाठी राहत होता. तो पुण्याहून आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी बोरगावमधील आपल्या शेताकडे गेला. त्यानंतर त्याने तिथेच पत्नी आणि मुलीचा मान पिरगाळून खून केला आणि स्वतःही लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात मृत अंदव्वाची आई ललिता भीमाशंकर घोडके यांनी मृत जावई सतीशच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यात सतीश हा माझ्या मुलीवर वारंवार चारित्रचा संशय घेत होता आणि त्यामुळे मारहाण करीत होता.
 
मुलगी सतत आमच्याकडे तक्रार करायची पण आम्ही मुलीला सतत समजावून पुण्याला नवर्‍याकडे पाठवीत होतो. तरीही सतीशने खुनाचे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 
दरम्यान, हत्येचे कारण हे चारित्र्याचा संशय हेच असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अक्कलकोट पोलीस घटनास्थळी पोहोचून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.