शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोठा खुलासा: कळसकर, अंदुरेकडूनच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरेने या दोघांनीच नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.
 
शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली, तेव्हा 'मी आणि साथीदार सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला,' अशी माहिती कळसकरने सीबीआयला दिली. याबाबत सीबीआयने विशेष न्यायालयात अहवाल सादर केले.
 
पुण्यातील विशेष कोर्टात सीबीआयने एक अहवाल सादर केला. या अहवालात कळसकर आणि अंदुरे या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. 'गेल्या वर्षी जून महिन्यात मी अ‍ॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता,' असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत 'सीबीआय'ला सांगितले. 
 
दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली कळसकरने दिल्याचे सीबीआयने या अहवालात म्हटले आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा असल्याचे मानले जात आहे.
 
डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.