सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (19:39 IST)

नरेंद्र मोदींची बोहरा समुदायाच्या कार्यक्रमाला उपस्थिती 2 वंदे भारत एक्स्प्रेसचंही उद्घाटन

narendra modi
देशाला नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन अर्पित करताना मला आनंद होत आहे, अशी मराठीतून सुरूवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (10 फेब्रुवारी) महाराष्ट्रातल्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन झालं.
त्यानंतर मुंबईतल्या मरोळमध्ये अल्जामिया-तुस-सैफीया(द सैफी अकादमी) च्या नवीन परिसराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. अल्जामिया-तुस-सैफिया ही दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे.
 
सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था समाजाच्या शैक्षणिक परंपरा आणि साहित्यविषयक संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे.
 
"तुमच्या सर्वांना भेटणं म्हणजे माझ्यासाठी कुटुंबाला भेटण्यासारखं आहे. मी गेल्या चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडला गेला आहे. मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे," असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
 
यावेळी दाऊदी बोहरा समुदायाकडून केल्या जाणाऱ्या समाजिक कामांची पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली.
 
"बोहरा कुटुंबातील लोक जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी मी तिथं गेल्यावर ते मला भेटायला येतात. एवढं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे," असं त्यांनी म्हटलं.
 
'तुळजापूरच्या भवानीचं, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन सोपं होणार'
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन मार्गांवर या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत.
 
'वंदे भारत' एक्सप्रेसच्या वेगामुळे हा प्रवास नेहमीपेक्षा एक ते दोन तासांनी कमी होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
 
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विणी वैष्णव यांचे आभार मानले.
 
मोदी सरकारनं यंदा पहिल्यांदा रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 13,500 कोटी रुपये दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
 
उद्घाटनाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, या दोन्ही गाड्या देशाच्या आर्थिक राजधानीला आस्थेच्या शहरांशी जोडेल. यामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वांनाच फायदा होणार आहे.
 
या गाड्यांमुळे शिर्डीच्या साईबाबांचं, तुळजापूरच्या भवानीचं आणि पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन करणं सोपं होणार आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
त्यांनी पुढे म्हटलं, "देश मोठ्या वेगाने 'वंदे भारत' ट्रेन सुरू करत आहे. आता देशभरातले खासदार त्यांच्या भागात वंदे भारत सुरू करण्याची मागणी करत आहे. देशातल्या 17 राज्यांमधल्या 108 जिल्ह्यांमधून 'वंदे भारत' जाते.
 
पाचपट अधिक जास्त पैसे यंदा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. डबल इंजिन सरकरामुळे महाराष्ट्राता विकास कामांना वेग येईल."
 
पायाभूत सोयी-सुविधांबद्दल बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, यामुळे गरिबांना रोजगार मिळतो, श्रमिकांना, मध्यमवर्गांना सर्वांना रोजगार मिळेल. पायाभूत सुविधांमुळे व्यापारउदीम वाढेल.
 
'वंदे भारत'ची वैशिष्ट्यं
या दोन्ही रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रात धावणाऱ्या 'वंदे भारत' रेल्वेंची संख्या चारवर पोहोचणार आहे.
 
गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे मुंबई-अहमदाबाद आणि बिलासपूर-नागपूर वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या.
 
या पार्श्वभूमीवर वंदे भारत रेल्वेविषयीच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात.
* वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे असतात. त्यापैकी 2 एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आहेत. प्रत्येक डब्याची एकूण आसन क्षमता 1,128 प्रवासी इतकी आहे.
* डब्यांच्या खालील रचना बदलण्यात आल्याने पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होते.
* सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे लावलेले असतात. त्याचं नियंत्रण रेल्वे चालकांकडे असतं.
* प्रत्येक डब्यात प्रवाशांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी संपर्क यंत्रणा (GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) लावण्यात आलेली असून त्यामध्ये 32 इंची एलसीडी टीव्हीसुद्धा समाविष्ट आहे.
* मनोरंजनाच्या उद्देशाने ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था. बाहेरील उष्णता आणि आवाज नियंत्रित ठेवम्यासाठी इन्सुलेशन.
* प्रकाशयोजना संयुक्त आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध. इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास ट्रेनच्या प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन दिव्यांची सोय.
* गरम जेवण, गरम आणि थंड पेयपदार्थ देण्यासाठी पॅन्ट्री कारची सोय.
* बायो-व्हॅक्यूम प्रकारातील शौचालयांची प्रत्येक डब्यात सुविधा.
 
Published By - Priya Dixit