मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (10:06 IST)

नवाब मलिक : 'देवेंद्र फडणवीस यांची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करा'

राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
 
तर तिकडे "नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं वाटतं, त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा," असं विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
 
"जयदीप राणा या व्यक्तीचा मी ट्विटरवर फोटो टाकला आहे. ड्रग्ज संदर्भात राणा यांना अटक करण्यात आली आहे. तो सध्या साबरमती जेलमध्ये आहेत. त्याचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत," असा आरोप मलिक यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, "फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छतेविषयीच्या मोहिमेचं गाणं गायलं होतं. या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचे चांगले संबंध आहेत."
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यवसायाशी काय संबंध आहेत, त्यांचे आणि जयदीप राणाचे काय संबंध आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
 
तर, "नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा त्याआधारे ट्विट करायचं आणि सनसनाटी पैदा करायचा प्रयत्न करण्याची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसते.
 
"समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा अट्टहास ते रका करत आहेत. त्यांनी मंत्रीपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केलेला दिसतोय, त्यांचा राजीनामा घ्यायला हवा," अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
 
"देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे निरज गुंडे यांच्यामार्फत पैसे उकळले जायचे. देवेंद्र यांची निरज गुंडे यांच्याशी उठबस होती. हा देवेंद्र फडणवीस यांचा 'वाझे'सगळीकडे फिरत होता. ड्रग्जचा मास्टरमाईंड महाराष्ट्राचा पूर्व मुख्यमंत्री आहे का? असा प्रश्न मनात उपस्थित होतो," असंही मलिक म्हणाले आहेत.
 
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी नुकतीच वानखेडे कुटुंबीयांची भेट घेतली.
 
याविषयी बोलताना मलिक म्हणाले, "हलदर म्हणाले की समीर दाऊद वानखेडे यांनी धर्मपरिवर्तन केलं नाही. हलदर एका घटनात्मक पदावर आहेत. असं असतानाही ज्या व्यक्तीवर (समीर वानखेडे) संशय आहे, त्याच्या घरी जातात आणि त्याला क्लीन चीट देतात. अरुण हलदर त्यांच्या मर्यादा ओलांडत आहे. हलदर यांची वर्तणूक संशयाच्या भोवऱ्यात आहे."
 
"याप्रकरणी आम्ही देशाचे राष्ट्रपती आणि सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. या घटनाक्रमाची चौकशी करा, अशी मागणी करणार. जास्त बोललात तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकू, अशी धमकीही त्यांनी मला दिलीय."
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आठवले यांनी वानखेडे कुटुंबाला पाठिंबा दर्शवला होता.
 
याविषयी बोलताना मलिक म्हणाले, "रामदास आठवले यांच्यावर अनुसूचित जातींना न्याय देण्याची जबाबदारी आहे. पण, ते स्वत: दाऊद वानखेडे यांच्यासोबत बसून पत्रकार परिषद घेतात. हे दुर्दैवी आहे."
 
मी समीर वानखेडे यांची लहान मुलं, त्यांची दुसरी पत्नी यांची नावं किंवा फोटो सोशल मीडियावर शेयर केलेले नाहीत, असंही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं.
 
माझे जावई साडेआठ महिने जेलमध्ये होते. माझ्या जावयावरचं प्रकरण रद्द करण्यासाठी हायकोर्टात जाऊ. पुढची कायदेशीर लढाई लढणार, असंही मलिक म्हणाले.