सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (08:28 IST)

कोरोनाविरुद्ध निर्वाणीचा लढा, पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे – धनंजय मुंडे

कोरोनाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून, पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे व निर्वाणीचे आहेत. जिल्ह्यात कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
 
मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री धनंजय मुंडे बोलत होते.
 
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, मृत्युदर देखील वाढला असुन, योग्य उपचार, बेड ची उपलब्धता यासह ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शनची वेळेवर व रास्त भावात उपलब्धी या सर्वच बाबींवर ना. मुंडेंनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
बीड जिल्ह्याला ऑक्सिजनच्या बाबतीत पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनवू, जिल्ह्यात कुठेही एक लिटर ऑक्सिजन देखील कमी पडणार नाही, अशी खात्री यावेळी ना. मुंडेंनी दिली. तर दुसरीकडे रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, साठेबाजी व काळाबाजार करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत, याबाबत प्रभावी यंत्रणा राबवून दैनंदिन तत्वावर नियंत्रण समिती स्थापन करावी, ज्यांना आवश्यक त्यांनाच इंजेक्शन व तेही रुग्णालयामार्फत ही प्रणाली तातडीने विकसित करावी. जिल्ह्यात आलेले इंजेक्शन व वितरण याचे दररोज ऑडिट या यंत्रणेमार्फत केले जावे, असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
रुग्णांच्या व्यवस्थापनापासून ते इतर सर्वच बाबींमध्ये प्रशासकीय व्यक्तीकडून हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यास त्यावर कारवाई करू, कोणीही व्यक्ती किंवा समूह रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास ना. मुंडेंनी दिले आहेत.
दोन दिवसात ऑक्सिजनचे आणखी बेड वाढवा
 
जिल्हा प्रशासनाकडे २५०० ऑक्सिजन बेड तयार आहेत. लोखंडी सावरगाव कोविड सेंटर येथील बेड संख्या मागील काही दिवसात रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने कमी करण्यात आली होती, मात्र आताची रुग्णसंख्या पाहून, ऑक्सिजनचे सुविधा असलेल्या बेडस ची संख्या तातडीने वाढविण्यात यावी, बेडची संख्या कमी पडत असेल तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन तिथे सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही मुंडेंनी प्रशासनास दिले आहेत. याव्यतिरिक्त तालुका स्तरावर मंगल कार्यालये किंवा तत्सम आस्थापना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन तिथे विलगीकरण कक्ष स्थापन करावेत असे निर्देशही मुंडेंनी दिले आहेत.