गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:29 IST)

शनिवारपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘नो लस, नो एंट्री’

नाशिक जिल्ह्यात वाढता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून मंदिरात १० वर्षांच्या आतील मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांंना दर्शनासाठी शनिवार (दि.०८) पासून प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
 
दरम्यान सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टनंतर आता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज्या भाविकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील अशा भाविकांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिरात १० वर्षांच्या आतील मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांंना दर्शनासाठी मज्जाव करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी लसीकरण असणे महत्वाचे ठरणार आहे.
 
संपूर्ण राज्यात कोरोना आणि ओमायक्रोन ची धास्ती वाढत असून त्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक केले जात आहेत. सप्तशृंगी देवी ट्रस्टनेही नुकतीच दर्शनासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्या पाठोपाठ आता त्र्यंबक देवस्थाननेही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर मंदिरे उघडल्यानंतर त्र्यंबकला भाविकांचा गर्दी वाढली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून येत्या शनिवारपासून लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे.
 
त्र्यंबकेश्वेरी भाविकांचा राबता असतो. नुकतेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भेट दिली होती. तर कालच अभिनेत्री शिल्पा शेट्टी सह पती राज कुंद्रा यांनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. दरम्यान त्र्यम्बक देवस्थान या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून म्हणजेच ०८ जानेवारीपासून करणार असल्याचे ट्रस्टचे चेअरमन विकास कुलकर्णी यांनी सांगितले आहे.