नाशिकमध्ये सोमवारपासून ‘नो व्हॅक्सीन नो एंट्री’
कोरोना प्रादुर्भाव रोखण्पायासाठी शासकीय यंत्रणा लसीकरणाचा वेग वाढवत आहेत. नाशिकमध्येही लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. आता शहरातील महत्वाच्या ठिकाणी दोन डोस घेतले असल्यासच प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. यात नाशिकमध्ये सोमवारपासून नो व्हॅक्सीन नो एंट्री असणार आहे. जिल्हा आणि शहरभरात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने लसीकरणाचा वेग प्रचंड वाढवला आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद फारसा मिळत नसल्याने आता ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे लस न घेणाऱ्यांना शहरातील महत्वाच्या ठिकाणी मज्जाव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी गुरुवारी नुकतीच जिल्हा प्रशासनाने आढावा बैठक घेतली. त्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणासह नव्याने कराव्या लागणाऱ्या लसीकरणाबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच ज्या नागरिकांनी अद्याप पहिला डोसही घेतलेला नाही, त्यांच्या लसीकरणावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लसीकरण टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाचे नो व्हॅक्सिन, नो एंट्री चा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व शासकीय आणि खासगी ठिकाणी ही सक्ती केली जाणार आहे.
दरम्यान नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची गरज असून, दुसरा डोस राहिलेल्यानी देखील नजीकच्या रुग्णालयात संपर्क साधून लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.