शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (15:12 IST)

वायव्य भारत, उत्तरेत थंडीची लाट नाशिक येथे सर्वांत कमी तापमान नोंदविण्यात आले

पुणे:वायव्य तसेच उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट पसरली असून, यामुळे महाराष्ट्र देखील गारठला आहे. राज्यात सोमवारी नाशिक येथे सर्वांत कमी 10.2 अंश सेल्सिअसइतके तापमान नोंदविण्यात आले.
राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीच्या भागात तीव्र थंडीची लाट पसरली आहे. या भागातील किमान तापमान खालावले आहे. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरच्या भागातही उणे तापमान नोंदविण्यात आले आहे. थंडीमुळे दल सरोवर गोठले आहे. या भागात हिमवर्षावाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. थंडीमुळे या भागात मोठय़ा प्रमाणात धुके पसरले आहे. यामुळे दळणवळणावरही परिणाम झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा तसेच धुक्याचा परिणाम जाणवणार आहे.
 
पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच राजस्थानच्या भागात तीव्र थंडीची लाट आहे. पश्चिम राजस्थानच्या भागातील चुरू येथे सोमवारी सर्वांत कमी 0 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. याशिवाय या राज्यात अनेक शहरांत एक अंकी किमान तापमान राहिले आहे. या भागात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
महाराष्ट्र गारठला.
 
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांत वाढ झाल्याने राज्यातील किमान तापमानही घटले आहे. निफाड येथे 7 अंश सेल्सिअस, तर नाशकात 10.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नेंदविण्यात आले. पुढील चार दिवस राज्यात कोरडे राहणार असल्याने थंडी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील विविध शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे : कुलाबा 19.2, सांताक्रूझ 16, रत्नागिरी 17.6, डहाणू 15.2, पुणे 12.1, लोहगाव 14.5, जळगाव 13.5, कोल्हापूर 17.7, महाबळेश्वर 14, नाशिक 10.2, सांगली 15.6, सातारा 12.9, सोलापूर 19.4, औरंगाबाद 11, परभणी 16.4, नांदेड 17.2, अकोला 17.4, अमरावती 16, बुलढाणा 16.8, ब्रह्मपुरी 15.5, चंद्रपूर 17.4, गोंदिया 15.2, नागपूर 15.3, वर्धा 16.3, यवतमाळ 16.5, गोवा 20.2
 
Edited By- Ratnadeep Ranshoor