कुख्यात गँगस्टार डॉन अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ
कुख्यात गँगस्टार डॉन अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी केली. सुनावणीसाठी यावेळी अरुण गवळी मुंबईतून हजर होता.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 13 मार्च रोजी 45 दिवसांची पॅरोलची रजा दिली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार गवळीला 27 एप्रिलला तुरुंगात हजर व्हायचे होते. मात्र देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अरुण गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी करत नागपूर खंडपीठाने 14 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 10 मे पासून पुढील 14 दिवस ही मुदतवाढ देण्यात आली आहे.