मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (08:29 IST)

आता वाघाचे फोटो काढण्यासाठी दसऱ्याला शिवतीर्थावर या,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत परवानगी दिल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मोठा जल्लोष केला. शिवसेना भवन येथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर आनंद साजरा करत एकमेकांना पेढे भरवले आहेत. यावेळी शिवसेनेच्या वाघिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. पंतप्रधान मोदी चित्त्यांचे फोटो काढण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेले. आता वाघाचे फोटो काढण्यासाठी दसऱ्याला शिवतीर्थावर या, असे या महिला शिवसैनिकाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला एक अट घातली, यात दोषी आढळले तर पुढच्या वेळी परवानगी नाकारण्यासाठी ते कारण ठरेल असाही इशारा न्यायालयाने दिला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देताना  कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. पोलीस व्हिडीओ शुटींग करतील. काही घटना घडली आणि याचिकाकर्ते कोणत्याही घटनेला जबाबदार असल्याचे आढळले तर भविष्यात त्यांना तिथे दसरा मेळावा नाकारण्याचे कारण ठरू शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यातच एका शिवसैनिकाने थेट पंतप्रधान मोदींना दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येण्याचे आव्हान दिले आहे.
 
उच्च न्यायालयाचा निकाल शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकणारा
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने दिलेला निकाल हा शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देऊ इच्छिते की, आपण चित्त्याचा फोटो काढण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. आता वाघाचा फोटो काढण्यासाठी मुंबईत शिवतीर्थावर या. तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये मावणार नाही, पण इतक्या जिगरबाज आणि निष्ठावंतांचा फोटो काढून जा, असे या महिला शिवसैनिकाने म्हटले आहे.