गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (10:09 IST)

Omicron : मुंबई, पुण्याच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार, 'हे' आहेत नियम

दीपाली जगताप
महाराष्ट्रातील शाळा एक डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहेत अशी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत स्पष्ट घोषणा केली आहे पण मुंबईत 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत.
 
मुंबई महानगरपालिकेनी हे स्पष्ट केले आहे की मुंबईत पहिली ते सातवीच्या मुलांच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होतील असं स्पष्ट केलं आहे.
 
औरंगाबाद शहरातल्या शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर घेतला जाईल, पण ग्रामीण भागातल्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
 
पुणे आणि ठाणे, नवी मुंबईच्या शाळा 15 डिसेंबर नंतरच सुरू होतील.
 
नाशिकबाबतचा निर्णय 10 डिसेंबर नंतर घेण्यात येणार आहे.
एक डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्याबाबत आम्ही आनंदी आहोत, असं म्हणत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याची घोषणा काल केली होती. पण आज हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
 
याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "शाळा उद्यापासून सुरू होणार होत्या पण ओमिक्रॉनचा धोका नेमका किती संभवतो याचा अंदाज येत नसल्याने 15 तारखेपर्यंत शाळा उघडण्याचा लांबणीवर टाकावा लागलाय."
 
शाळा सुरू करण्यासाठीची नियमावली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे जारी केली होती . शाळा प्रशासन आणि पालक यांना याबाबत सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
खरंतर याआधीच महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दक्षिण अफ्रिकेतून 'ऑमिक्रॉन' या नव्या कोरोना व्हेरियंटची माहिती समोर आल्यानं अनेकांच्या मनात साशंकता होती.
 
नव्या व्हेरिएंटचे रुग्ण दक्षिण अफ्रेकेसह आतापर्यंत बोत्स्वाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि इंग्लंडमध्ये आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हेरियंटला 'Variant of Concern' म्हणजेच 'काळजी करण्याजोगा व्हेरियंट' म्हटलंय.
 
शाळा सुरू होणार, पण 'या' नियमांसह
दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान 6 फूट अंतर ठेवावे
शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणं बंधनकारक आहे.
वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
शाळांमध्ये बायोमेट्रिक अटेंडंसचा अवलंब करू नये
शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास परवानगी
विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचं पालन करावं.
क्वारंटाइन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.
शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोना बाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा
शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे
शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नयेयामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास शाळा दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी.
शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे. उदाहरण - एक बॅच पहिल्या दिवशी तर दुसरी बॅच दुसऱ्या दिवशी किंवा सकाळ दुपार सत्रामध्ये किंवा महत्त्वाच्या विषयासाठी बोलवावे
शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात
या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत. त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी
पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल
सर्व शाळांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं - शिक्षणमंत्री
"येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे," असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
 
पालकांमध्ये कशाची भीती?
18 वर्षांखालील मुलाचं लसीकरण झालं नसल्याने पालकांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याविषयी साशंकता असल्याचं दिसून येतं. नवीन व्हेरिएंट हा अधिक घातक असल्याच्या बातम्या येत असल्याने पालकांची चिंता आणखी वाढली आहे.
पनवेल येथे राहणाऱ्या रविंद्र कळंबेकर यांची मोठी मुलगी आठवीत शिकते तर लहान मुलगा चौथीच्या वर्गात शिकतो. 1 डिसेंबरपासून या दोन्ही मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुलांना शाळेत पाठवयचं की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मला वाटतं मुलांचं लसीकरण आता सरकारने प्राधान्याने करून घ्यायला हवं. त्याचं कारण म्हणजे सरकारने कितीही सूचना आणि नियम सांगितले तरी शाळांमध्ये प्रत्यक्षात त्याचं पालन होत आहे का हे आम्हाला कसं कळणार? माझ्या मुलीच्या एका वर्गात 80 विद्यार्थी शिकतात. आता एका वर्गातील 80 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक बेंच वापरला तर शाळेला किमान तीन वेगवेगळ्या वर्गांचं नियोजन करावं लागेल आणि एकच विषय तीन वेळा शिकवावा लागेल. त्यामुळे शाळांसाठी हे प्रॅक्टिकली शक्य आहे का हा सुद्धा प्रश्न आहे."
 
"पनवेल, नवी मुंबई किंवा मुंबई आणि इतर शहरांमधील शाळा पाहिल्या तर विद्यार्थी संख्या जास्त आणि जागा कमी अशी परिस्थिती दिसते. अनेक शाळांमध्ये एकच शौचालय असते. त्यामुळे सुरक्षित अंतर आणि स्वच्छता कशी राखली जाणार याची आम्हाला काळजी आहे. त्यात नवीन व्हेरिएंटची माहिती आम्ही वाचली. जगभरात त्याबाबत काळजी आहे. आम्हालाही म्हणूनच मुलांना शाळेत पाठवावं का असा प्रश्न आहे. सरकारने याबाबत पुनर्विचार करावा असं मला वाटतं,"
 
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात वेगळी परिस्थिती असू शकते. कारण ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या ही तुलनेने कमी असते. शाळेत आणि शाळेबाहेरच्या आवारात सहसा पुरेशी जागा असते. त्यामुळे व्यवस्थापन करणं सोपं जातं असं शिक्षकांचं म्हणणं आहे.
पुण्यातील पालक जयश्री देशपांडे सांगतात, नवीन व्हेरिएंटची माहिती आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लस घेतलेल्यांसाठी आणि न घेतलेल्यांसाठी वेगवेगळे नियम असतील असं जाहीर केलं. मग मुलांना तर आपण लस दिलेलीच नाही. त्यांना शाळेत पाठवण्यास आपण तयार आहोत का? असा प्रश्न आमच्यासमोर आहे.
 
त्या पुढे म्हणाल्या, "शाळांमध्ये मुलं गर्दी करतात, एकत्र खेळतात, तेव्हा ते एकमेकांच्या संपर्कात येणार हे स्पष्ट आहे. मुलांना लस देत नाही तोपर्यंत शाळेत पाठवण्यासाठी आम्ही तयार नाही. कारण शाळा सुरू झाली की ते गर्दीत जाणार, सुरक्षित अंतर त्यांना राखता येणार नाही. पालकांनी सहमती पत्र द्यायचं आहे म्हणजे जबाबदारी पालकांनी घ्यायची असा अर्थ होतो."
 
इंडिय़ा वाईड पॅरेंट असोसिएशनच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी सांगितलं, "राज्यात अद्याप दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्सवर बंदी घातलेली नाही. प्रवाशांना केवळ क्वारंटाईन केलं जात आहे. नवा विषाणू झपाट्याने इतर देशांमध्येही पसरत असताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने लहान मुलांसाठी अधिक सतर्क रहायला हवं. पालकांमध्ये भीतीचं वातावरण असणं स्वाभाविक आहे. कारण दोन वर्ष आपण सगळ्यांनीच अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे शाळांचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा हीच आमची मागणी आहे."
 
महाराष्ट्रातही निर्बंध लागू
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचा पालन करावं लागेल, तर इतर राज्यातून येणारा प्रवासी दोन्ही लशी घेतलेला असावा किंवा 72 तासांपूर्वी RT-PCR चाचणी केलेला असावा, असं महाराष्ट्र सरकारनं नव्या नियमावलीत म्हटलंय. राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठीही लशीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आलीय. कार्यक्रम, सभागृह, मॉल्स यांमध्ये प्रवेशासही हा नियम लागू करण्यात आलाय.
 
मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. अन्यथा 500 रुपयांचा दंड आकरला जाईल.
 
राजेश टोपे म्हणाले, "या संदर्भात मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मला दक्षिण आफ्रिकेवरून येणारी विमानं थांबवण्याची विनंती केली. पण तसं करण्याचे अधिकार राज्याकडे नाहीत. त्यामुळे आम्ही या बाबी केंद्र सरकारला कळवल्या आहेत. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येईल."
 
"महाराष्ट्रात सध्या तरी अशा प्रकारचा कोणताही व्हेरिएंट आढळलेला नाही. त्यामुळे सध्या काळजी करण्याचा विषय नाही. पण आपल्याला सतर्क राहावं लागेल. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी आपल्याला काळजीपूर्वक करावी लागेल," असंही टोपे यांनी म्हटलं.
 
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटच्या भीतीपोटी जगभरातील देशांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्यानं प्रवासावरील निर्बंधांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटर (एनसीओसी) च्या अधिसूचनेनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका पाहता, सात देशांवर प्रवासासंबंधी निर्बंध लागू केले आहेत.
 
यानुसार दक्षिण आफ्रिका, लेसोथो, इस्वातिनी, मोझाम्बिक, बोत्सवाना आणि नामिबियामधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
 
ब्रिटननं दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करणाऱ्यांवर बंदीबरोबर देशामध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर केले आहेत.
 
पुढील आठवड्यापासून दुकानात खरेदी करताना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना, मास्क परिधान करणं अनिवार्य असेल, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.
 
ओमिक्रॉन व्हेरिएंट किती भयानक?
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे.
 
या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णय "भयावह" विषाणू असं केलं आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
 
केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं आहे. तर राज्य कोरोना टास्क फोर्ससुद्धा याबाबत सतर्क झाला आहे.