रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (17:00 IST)

शिवजयंती व धार्मिकस्थळांचा मुद्द्यावरून फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी शिवजयंती व धार्मिकस्थळांचा मुद्दा उपस्थित करत, महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरेल.
 
फडणवीस म्हणाले, या सरकारला असं वाटतं की करोना कुठं वाढतो तर फक्त मंदिरांमध्ये वाढतो. शिवजयंती आणि मंदिरं यातूनच करोना वाढतो? काहीतरी आकडेवारी द्यावी की कुठलं मंदिर उघडल्याने करोना वाढला. केवळ मंदिरच नाही तर मी सर्व धार्मिक स्थळांचा विचार करतोय. देशभरातील धार्मिकस्थळं उघडली कुठही करोना वाढला नाही आणि महाराष्ट्रात करोना वाढला तर तो धार्मिकस्थळ उघडायला लावल्यामुळे वाढला? मला आश्चर्य वाटतं पब चालू शकतात, दारूची दुकानं चालू शकतात, हॉटेल चालू शकतात, सिनेमागृहे चालू शकतात, राजकीय मेळावे देखील चालू शकता यामुळे करोना होत नाही? पण मंदिर व शिवजयंतीमधून करोना होतो? हे जे काय सुरू आहे ते चुकीचं आहे. वारकरी परंपरा ही खूप मोठी परंपरा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महाराष्ट्राची जशी संपूर्ण विश्वात ओळख आहे, तशीच वारकरी संप्रदायामुळे देखील आहे. पण त्याही संदर्भात या ठिकाणी वारंवार विषय उपस्थित करावा लागतो, हे खरोखर अत्यंत दुर्देवी आहे.