गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (07:46 IST)

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत १ लाखाहून अधिक घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये अर्थसहाय्य

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना तसेच घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्या एकूण १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
 
या निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण (डीबीटी) द्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरून लवकरच करण्यात येत आहे. घरेलू कामगारांच्या थेट खात्यात शासनातर्फे मिळणारा हा निधी जमा होणार असल्याने घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
 
घरेलू कामगारांप्रमाणेच राज्यातील नोंदीत सक्रिय १३ लाख बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत ९ लाख १७ हजार नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. त्याशिवाय गेल्या वर्षीही कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती, असेही कामगारमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.