गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (22:31 IST)

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील ८ नेत्यांना संधी

भारतीय जनता पक्षाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. यात भाजप नेते खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन सरकारवर टीका करत होते. त्यांच्या टीकेचा फटका त्यांना बसला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या ८० सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनाही या राष्ट्रीय कार्यकारी स्थान मिळालं आहे.

भाजपने राष्ट्रीय कार्य समितीमध्ये ८० सदस्यांचा समावेश केला आहे. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, एस जयशंकर, गिरीराज सिंह, रमेश बिधुरी, मनोज तिवारी, श्रीपाद नायक, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, डॉ जितेंद्र सिंह, पहलादा जोशी, निर्मला सीतारमण, मुरलीधरन, नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य सिंधिया, नरोत्तम मिश्रा, धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी, सोम प्रकाश, ओम प्रकाश माथुर, गजेंद्र सिंह शेखावत, जसकौर मीना, जी किशन रेड्डी, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नकवी, संतोष गंगवार, साध्वी निरंजन ज्योती, मिथुन चक्रवर्ती, अनिल जैन, संजीव बाल्यान, दिनेश त्रिवेदी, अनिर्बन गांगुली इत्यादींचा समावेश आहे.
१३ उपाध्यक्ष
राष्ट्रीय उपाध्यक्षपदासाठी १३ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये छत्तीसगडचे डॉ.रमण सिंह, राजस्थानचे वसुंधरा राजे शिंदे, बिहारचे राधा मोहन सिंग, चंदीगडचे सौदन सिंह, ओडिशाचे बैजयंत जय पांडा, झारखंडचे रघुवर रस, पश्चिम बंगालचे दिलीप घोष, बेबी राणी मौर्य आणि रेखा यांचा उत्तर प्रदेशातून समावेश आहे. तर, गुजरातमधून डॉ.भारती बेन शियाल, तेलंगणातून डीके अरुणा, नागालँडचे एम चुबा आओ आणि केरळमधील अब्दुल्ला कुट्टी यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारणीत करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच जावडेकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर चित्रा वाघ गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं ठाकरे सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरत आहेत.
 
पंकजा मुंडेंना काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्याकडे मध्य प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे हरयाणाचं, तर सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात २०२३ मध्ये, तर हरयाणात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
 
विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.