अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर
मुंबई राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. ह्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झाली. याच पार्श्वभूमीवर, दिलासा देत आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सर्व यंत्रणांनी ही मदत तात्काळ बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घावी, असे स्पष्ट निर्देश देखील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तेथील शेतकऱ्याशी संवाद साधला होता. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. याच अनुषंगाने आता राज्याच्या महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी केला आहे.
विभागांनुसार मदतीचं वाटप
अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचं वाटप विभागांनुसार पुढीलप्रमाणे होणार आहे. यात पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये, कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख रुपये, नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.