1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 27 एप्रिल 2021 (09:50 IST)

डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात याचिका दाखल

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची तुटवडा निर्माण झाला आहे. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीतून एका खासगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचे बॉक्स आणले होते. यावरुन सुजय विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीतून रेमडेसिवीर इंजेक्शन बेकायदेशीरपणे आणल्यामुळे त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीतून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला होता यानंतर जिल्ह्यातील रुग्णालयांत या रेमडेसिवीरचे वाटपर करण्यात आले याबाबत काही पुरावा दिला नसल्यामुळे अरुण कडू यांच्यासह तीन जणांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.
 
रेमडेसिवीर खरेदी करण्याची परवानगी फक्त राज्य सरकारला आहे. परंतु खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर महाराष्ट्रात खासगी विमानाने आणले तसेच ते परस्पर वाटून टाकले आहेत. मात्र सुजय विखे पाटील यांनी आणलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती हे माहित नाही तसेच इंजेक्शनचे वाटप बेकायदेशीरपणे करण्यात अल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
 
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आणलेली रेमडेसिवीर इंजेक्शन ताब्यात घेऊन कायदेशीरपणे गरजू व्यक्तींना वाटण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहेत. तसेच याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेची न्यायालयाकडून दखल घेण्यात आली आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याची शंका न्यायालयाने व्यक्त करत याप्रकरणात गुन्हा दाखल का करु नये याबाबत विचारणा केली आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहेत. तसेच २९ तारखेपर्यंत यावर उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यावर पुढील सुनावणी येत्या २९ एप्रिलला करण्यात येणार आहे. यामुळे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.
 
सुजय विखे पाटील यांनी काय म्हटले होते
सुजय विखेंनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत म्हटले आहे की, सर्व पक्षातील लोकांसाठी ही इंजेक्शन आहेत. त्यामुळे याचे कोणीही राजकारण करु नये, हा व्हिडिओ मुद्दाम दोन दिवस लेट अपलोड काल आहे. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती असे सुजय विखे पाटील यांन म्हटले आहे. तर माझ्याकडून जमेल तितकी मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न करत आहे. तरुण युवक तडफडत आहेत त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण आणू नये, ज्या लोकांनी मला खासदार केले आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडून जमेल तेवढी मदत मी करत आहेत. लोकांना डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही. हा पैसा कमवण्याचा धंदा नाही आहे तर लोकप्रतिनिधी म्हणून हे काम करणे माझी जबाबदारी आहे. याचे मला समाधान असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.