रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 17 जानेवारी 2018 (09:02 IST)

प्लॅस्टिक वेस्टनला राज्यभरात बंदी?

प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकोलच्या प्लेटस्‌, ताट, वाट्या, चमचे, कप, ग्लास, बॅनर्स, तोरण, ध्वज आदी सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेस्टन याचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यास संपूर्ण राज्यात लवकरच बंदी घालण्याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने जारी केली आहे.
 
प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकची इतर उत्पादने ही नैसर्गिक व जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्याने त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. जलनि:सारणास अवरोध निर्माण होऊन पाणी तुंबते व त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लॅस्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लॅस्टिकचा संपूर्णपणे वापर थांबावा, निर्मिती थांबावी म्हणून लवकरच सरकारतर्फे बंदी घालण्याचे प्रयोजन आहे.
 
प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तुंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत व जनतेत जनजागृती करण्यासाठी संबधित नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केलेले आहे. तसेच मॉल्स, दुकानदार, मोठे व्यापारी, भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांनीही प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही पर्यावरण विभागाने केले आहे. दुकाने, आस्थापना, मॉल्स यांना परवाने देणाऱ्या प्राधिकरण अथवा निरिक्षकांनी अशा आस्थापनांचे नूतनीकरणाच्या वेळी प्लॅस्टिक वस्तुंचा वापर टाळण्याबाबतची अट घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.