मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (17:33 IST)

प्रभाकर साईल मृत्यूप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश- दिलीप वळसे पाटील

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे एक प्रमुख साक्षीदार पंच प्रभाकर साईल यांचा मुंबईत मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आज सकाळी मिळाली.
 
त्यांच्या मृत्यूची घटना अचानक घडलेली घटना आहे आणि निश्चितपणे संशय निर्माण होणारी परिस्थिती असल्यामुळे यासंदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला प्राथमिक माहिती गोळा केली जाईल आणि मग त्या माहितीच्या आधारे योग्य ती चौकशी करण्यात येईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे. येत्या काही दिवसात साईल यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल येण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
शुक्रवारी संध्याकाळी प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती, त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.
 
प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारे म्हणाले, "शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली."तुषार खंदारे पुढे म्हणाले, "त्यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे.
 
आर्यन खानच्या अटकेनंतर प्रभाकर साईल यांनी NCB चे माजी झोनल डिरेक्टर समीर वानखेडेंवर 8 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यामुळे प्रभाकर साईल चर्चेत आले होते.
 
शनिवारी सकाळी प्रभाकर साईल यांच्या धक्कादायक मृत्यूची बातमी आली. साईल यांचा मृत्यू अचानक झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मुंबई पोलिसांनाही साईल यांचा मृत्यू झाल्याची माहिती नव्हती.
 
प्रभाकर साईल यांच्या मृत्यूबाबत नार्कोटिक्स कंट्रोल विभाग आणि मुंबई पोलिसांनी अधिकृतरित्या काही वक्तव्य केलेलं नाही.
 
प्रभाकर साईल यांचं मुंबईत स्वत:चं घर नव्हतं. त्यामुळे चेंबूर भागातील माहुल परिसरात ते भाड्याच्या घरात रहात होते. प्रभाकर साईल यांच्या आई मुंबईतील अंधेरी परिसरात रहातात. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
कोण होते प्रभाकर साईल?
36 वर्षांचे प्रभाकर साईल आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे एक प्रमुख साक्षीदार होते.
मुंबई बंदरावर 2 ऑक्टोबरला 2021 ला कॉर्डिलिया क्रूजवर NCB छापेमारी केली होती. या कारवाीत NCB ने बॉलीवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यनना ड्रग्ज प्रकरणी अटक केली. या कारवाईत प्रभाकर साईल यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोसाठी साक्षीदाराचं काम केलं होतं
 
कॉर्डिलिया क्रूजवर प्रवासी येण्यापासून ते आर्यन खानच्या अटकेपर्यंत प्रभाकर साईल एनसीबीच्या पथकासोबत कारवाईत होते.
 
पण, आर्यन खानच्या अटकेनंतर दोन दिवसांनी साईल यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एक व्हीडिओ जारी केला. त्यात त्यांनी NCB चे माजी झोनल डिरेक्टर समीर वानखेडेंवर 8 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक आरोप केला. समीर वानखेडेंवर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे प्रभाकर साईल चर्चेत आले होते.
 
NCB च्या एका प्रमुख साक्षीदाराने समीर वानखेडेंवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केल्यामुळे, आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं होत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा एक साक्षीदार किरण गोसावी यांचे बॉडीगार्ड म्हणून प्रभाकर साईल काम करत होते.