शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (09:08 IST)

धुळ्यात पाच हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक,हवालदारला पकडले

Bribe
मोटार अपघात दाखल करुन वाहन सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने हे वाहन धुळ्यातील देवपूर पोलिसांनी जप्त केले होते. या किरकोळ अपघाताबाबत मोटार अपघात दाखल करुन संबंधितांचे वाहन सोडण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे संबंधित वाहन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली. पथकाने १७ जानेवारीच्या रात्री साडेनऊ वाजता देवपूर पोलीस ठाण्यातच सापळा रचला. लाच म्हणून पाच हजार रुपये स्वीकारताना पथकाने पाटील आणि मोराणीस दोघांना रंगेहात पकडले. रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय तसेच निमशासकीय कोणत्याही कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देवू नयेत, कोणी पैसे मागितल्यास तक्रार करावी. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी
केले आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor