बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (08:10 IST)

छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ठेवलं कोंडून; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याण : भंगाराच्या दुकानात चौकशी करण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात सदर माहिती दिली असता महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. पोलिसांनी कोंडून ठेवणाऱ्या दोन इसमासह अन्य एक जनाविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नाव शौकत शेख आणि इशाद बागवान अशी आहेत. भर दुपारी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
 
बैलबाजार परिसरात असलेल्या एका गोडाऊन मध्ये रेल्वेचे चोरी केलेलं भंगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस ठाण्याचे दोन पोलिस कर्मचारी भंगार ठेवलेल्या गोडाऊनला गेले होते. गोडाऊन मध्ये जाताच त्याठिकाणी असलेल्या शौकत याने शटर बंद करत त्यांना चक्क गोडावून मध्ये कोंडून ठेवत बाहेरून कुलूप लावलं.
 
दरम्यान, कर्मचारी जयेश गोसावी आणि अन्य एका पोलिस कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत या कर्मचाऱ्याची सुटका करत कोंडून ठेवणाऱ्या शौकत शेख आणि इशाद बागवान व त्यांचा साथीदार अस्लम शेख विरोधात गुन्हा दाखल करत शौकत शेख आणि इशाद बागवान यांना अटक केली आहे. तर चोरीचं भंगार ठेवणाराना अस्लम शेख हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.