मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (18:47 IST)

नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
नवाब मलिक यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशचं. तिथं त्यांची शेती आणि इतर व्यवसाय होते. आर्थिक स्थितीही ठिकठाक होती. नवाब यांचे वडील मोहम्मद इस्लाम मलिक हे त्यांच्या जन्मापूर्वीच मुंबईत स्थायिक झाले.

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला तालुक्यात दुसवा गावात 20 जून 1959 ला नवाब यांचा जन्म झाला.त्यानंतर मलिक कुटुंब पुन्हा मुंबईला परतलं.
 
मुंबईत मलिक कुटुंबांचे लहान-मोठे व्यवसाय होते. त्यांच्या मालकीचं एक हॉटेल होतं. त्या व्यतिरिक्त त्यांचे भंगारचे व्यवसाय आणि इतर काही कामं ते करायचे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं.
 
वयाच्या एकविसाव्या वर्षी 1980 साली नवाब यांचा विवाह मेहजबीन यांच्याशी झाला. त्यांना फराज, आमीर ही दोन मुलं तर निलोफर आणि सना या दोन मुली आहेत.
 
सुरुवातीला नवाब यांचं प्राथमिक शाळेतलं अॅडमिशन सेंट जोसेफ या इंग्रजी शाळेत करण्यात आलं होतं. पण त्याला वडील मोहम्मद इस्लाम यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींचा विरोध झाल्यामुळे त्यांनी शाळा सोडली.
 
पुढे महापालिकेच्या नूरबाग उर्दू शाळेत नवाब यांना दाखल करण्यात आलं. इथूनच त्यांनी चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर डोंगरीच्या जीआर नंबर 2 शाळेत सातवीपर्यंत आणि CST परिसरातील अंजुमन इस्लाम शाळेत अकरावीपर्यंतचं (तत्कालीन मॅट्रीक) शिक्षण त्यांनी घेतलं.
 
मॅट्रीक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बुऱ्हाणी कॉलेजमधून बारावी पूर्ण केलं. तसंच त्याच कॉलेजमध्ये बीएसाठी अॅडमिशन घेतलं. पण कौटुंबिक कारणामुळे त्यांनी बीएची अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही.

नवाब मलिक महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन फी वाढवली. त्याचा विरोध करण्यासाठी शहरात एक आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये नवाब मलिक यांनी सहभाग नोंदवला होता. याच कालावधीत त्यांनाराजकारणात रस निर्माण झालं.
मलिक यांनी नीरज कुमार यांच्यासमवेत मिळून सांज समाचार नावाचं वृत्तपत्र मुंबईत सुरू केलं. पण काही वर्षांनी आर्थिक अडचणींमुळे सांज समाचार बंद पडलं.

1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षाकडून पुन्हा विजय मिळवला. यावेळी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं आघाडी सरकार सत्तेत आलं.

समाजवादी पक्षाशी न पटल्यामुळे 2001 मध्ये पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला."

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिक यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार मंत्रालय या खात्यांचं मंत्रिपद सांभाळलं.2020 मध्ये मलिक यांना एनसीपी मुंबई चे अध्यक्ष पद दिले. ते एनसीपी प्रमुख शरद पवार यांचे  निकटवर्तीय मानले जातात.