1 ऑक्टोबरला शिर्डी विमानतळाचे उद्घाटन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद १ ऑक्टोबरला शिर्डी विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अहमदनगरमधील शिर्डी विमानतळाचा व्यावसायिक वापर करण्यास हवाई वाहतूक महासंचालनालने (डीजीसीए) मागील आठवड्यात परवानगी दिली. हे विमानतळ मुंबईपासून २३८ किलोमीटर अंतरावर आहे. १ ऑक्टोबरपासून साईबाबा संस्थान ट्रस्टकडून साईबाबा समाधी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.
‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी’ने (एमएडीसी) शिर्डीतील विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानतळाची मालकीदेखील याच कंपनीकडे राहणार आहे. शिर्डीसाठी झेपावणाऱ्या विमानातून अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे उड्डाण करणार आहेत.