बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (16:40 IST)

माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार - शरद पवार

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई शहरात माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माथाडी कामगारांच्या वतीने खासदार शरद पवार  यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , ज्येष्ठ नेते गणेश नाईक , आमदार नरेंद्र पाटील ,   संदीप नाईक, किरण पावसकर, महापौर सुधाकर सोनावणे, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली आहे ही गंभीर बाब आहे. सरकार कंत्राटी कामगारांना संरक्षण देत नाही, हे चांगले नाही, असे मत यावेळी पवार यांनी मांडले. आजच्या कार्यक्रमात काही कारणास्तव मुख्यमंत्री आले नाहीत पण आम्ही त्यांची स्वतंत्र वेळ घेऊन माथाडी कामगारांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडू, असे आश्वासनही त्यांनी दिले. माथाडी कामगारांचे मुंबई उभारण्यात महत्त्वाचे योगदान आहे. मेहनतीने काम करतानाच भविष्याची चिंताही माथाडी कामगारांना असते. म्हणूनच या कामगारांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रयत्न करू. आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी एक बैठक झाली तर नक्कीच माथाडी कामगारांचे प्रश्न सुटतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.