बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (08:38 IST)

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित? निवडणूक लांबणार?

काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.  चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार  २७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा असून २८ डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. 
दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने पूर्णवेळ अध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. मात्र ही प्रतिक्षा लवकरचं संपणार आहे. कारण राज्य सरकारच एक शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर राज्यपाल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मान्यता देतील याची खात्री असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहचले होते.
भेटीसंदर्भात बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनुसार राज्यपालांना दिला आहे. त्यामुळे राज्यपालांनी ही शिफारस मान्य करावी याची विनंती करण्यासाठी छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आम्ही गेलो होतो. त्यांना हा कार्यक्रम जाहीर करण्याची मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.
निवड कार्यक्रम बदलाबद्दल फार काही विचारणा केलेली नाही. बदल केलेत ते लोकसभेत जी पद्धत तीच पद्धत महाराष्ट्र विधानसभेकरिता केलेली आहे. विधान परिषदही त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे चुकीचं काही केलं असं नाही. त्यांना फक्त काही अभ्यास करायचा आहे माहिती घ्यायची आहे ती घेऊन राज्यपाल कळवतो असं म्हटले आहेत. १२ आमदारांच्या निवडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र राज्यपाल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीची काही माहिती घेऊन मान्यता देतील अशी खात्री आहे. काही अडचण नाही निश्चित मान्यता देतील, बिगर अध्यक्षाचं कसं विधानसभा ठेऊ शकतात. ही फार अवघड प्रोसेस नाही एका फोनवर आम्हाला नाव समजेल आणि आम्ही नॉमिनेशन करु.
यावर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचे पत्र दिले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. ही निवडणूक उद्याच्या दोन दिवसांत व्हावी कारण विधानसभेला कायम अध्यक्ष असणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियमानुसार आम्ही राज्यपालांना ही मागणी केलेली आहे. य़ावर राज्यपालांनी देखील सकारात्मक भूमिका दर्शवली, त्यांनी एवढचं म्हटलं की, याबाबतीत कायदेशीर चर्चा करुन यावरनिर्णय कळवतो.