शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (15:30 IST)

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून यलो अलर्ट

rain
देशात सर्वत्र सूर्यनारायण आग ओकत असताना दिलासादायक वृत्त आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही तासात अंदमान आणि निकोबार बेटांवर नैऋत्यू मोसमी वारे म्हणजेच मान्सून दाखल होत आहे. याचा परिणाम केरळ किनारपट्टीसह राज्यातील किनारपट्टीवरही दिसून येणार आहे. कोकणासह राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ किनारपट्टीवरही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या १६ ते १९ मेदरम्यान राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
मॉन्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, आधी तो केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये साधारण १ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २७ मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात नैऋत्यकडे जाणारे पावसाळी वारे तसेच ताशी ४५ किमी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान आणि निकोबार बेटे, अग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते पाच दिवसात केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
मे महिन्यातील तप्त तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. परंतु यंदा वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. १५ मे रोजी अंदमानात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. हा अंदाज आता खरा होताना दिसत आहे.