मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (13:49 IST)

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय, अनेक ठिकाणी प्रतीक्षा, रिपोर्ट

rain
महाराष्ट्रात ब-याच दिवसांनी पावसाने हजेरी लावली. मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली असून महाराष्ट्रातही अनेक भागात पुन्हा   पाऊस सुरू  झाला. त्यामुळे राज्यातील बळीराजा सुखावला आहे. पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक भागात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.
 
तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस सुरू आहे. तसेच मराठवाड्यातही ब-याच भागात पावसाने हजेरी लावली. परंतु मोठ्या पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे माना टाकलेल्या खरीप पिकाला दिलासा मिळाला आहे.
 
मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज दिवसभरात मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रुज परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज मुंबईसह उपनगगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला.
 
पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातही रात्रीपासून पाऊस झाला. नाशिकच्या मालेगावातही पावसाने सलग दुस-या दिवशी हजेरी लावली. या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, बळीराजाला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जळगाव जिल्ह्यातही एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला. याशिवाय कोकणातही सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतरत्र जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांना जीवदान मिळाले.
 
मराठवाड्यातही काही ठिकाणी हजेरी
मराठवाड्यातील बहुतांश भागात अद्याप दमदार पाऊस झालाच नाही. जेमतेम पावसावर पिके जगत आहेत. मात्र, अजूनही सरसकट पाऊस होत नाही. तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावत असल्याने मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. इतरत्र मात्र, तुरळक ठिकाणी पाऊस झाला. लातूर, उस्मानाबादमध्ये शुक्रवार कोरडा गेला.
 
गोदावरीला पूर
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल मध्यरात्रीपासून नाशिकसह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदामाई खळाळली आहे. अनेक दिवसांनंतर दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor