सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (19:09 IST)

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
"राज ठाकरे यांना मोनोक्लोनल एंटीबॅाडी कॅाकटेल दिलं जाणार आहे. त्यांना तीन तासांनी डिस्चार्ज केलं जाईल," असं लिलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं आहे.
 
पारकर पुढे म्हणाले, "राज ठाकरे यांच्या आईंना डॅाक्टरांनी शुक्रवारी मोनोक्लोनल एंटीबॅाडी कॅाकटेल दिलं होतं. त्यांनंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे."
 
शनिवारी (22 ऑक्टोबर) राज ठाकरेंचा कोव्हिड-19 रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. पण, पालिका अधिकारी आणि मनसे नेते याबाबत अधिकृतरित्या काहीच बोलण्यास तयार नाहीत.
पालिका अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की, "राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत."
 
दरम्यान, आज राज ठाकरे मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार होते. पण हा मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेने दिलीये.
 
राज ठाकरे यांना अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात विनामास्क वावरताना दिसले आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे मास्क न घालताच पोहोचले होते.
 
राज आणि उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळीही राज ठाकरे हे विनामास्क दिसले होते.
 
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी रोजी मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरे विनामास्क दिसले होते.
 
याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,' असं ते म्हणाले होते.
 
राज यांच्या मास्क न वापरण्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोपरखळी केली होती.
 
मास्क घालतच नाही म्हणणाऱ्यांना माझा नमस्कार, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करत राज ठाकरे यांना म्हटलंय की, "मी आपणांस एका पत्राद्वारे मास्क परिधान करण्याची विनंती केली होती. तज्ञ नेहमी सांगतात की मास्क हे एक कवच आहे, जे आम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवते.
 
"आपणही आता मास्क परिधान करा. आपण लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी माझी ईश्वर चरणी प्रार्थना."