बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (18:02 IST)

राज ठाकरे: 'अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचं ठरलं होतं तर तेव्हाच का नाही सांगितलं?'

जर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं ठरलं होतं तर तेव्हाच का नाही बोललात असं टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते शिवसेना भाजप युतीवर बोलले.
 
राज्याच्या राजकारणात याआधी कधीही इतकी प्रतारणा झाली नव्हती तितकी आता होताना दिसत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. "आधी शिवसेनेनी युतीच्या नावावर मतं मागितली आणि नंतर दुसऱ्याच कुणासोबत सरकार स्थापन केलं. जर तुमचं अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचं ठरलं होतं तर तुम्ही आधीच सर्वांना जाहीर करायचं होतं. आमचं बंददाराआड ठरलं होतं असं म्हटलं गेलं. मग नंतर निकालानंतर हे का जाहीर केलं असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
 
पुढे राज ठाकरे म्हणाले, 'एकाच व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तेव्हा तुम्ही का आक्षेप नोंदवला नाही.'
 
जेव्हा पहिल्यांदा भाजप शिवसेनेची युती झाली होती. 1995-99 च्या वेळी तेव्हा असा फॉर्म्युला ठरला होता की ज्याचे जास्त आमदार त्याचे जास्त मुख्यमंत्री. म्हणजे जर यावेळी काही बदल झाला असेल तर तो जाहीर का गेला नाही. तुम्ही नंतर का सांगत आहात असा प्रश्न राज यांनी विचारला.
 
अशी प्रतारणा कधीच झाली नाही
राज ठाकरे यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले "कुणीतरी सकाळीच उठून राज्यपालाकडे जाऊ शपथ घेतो. नंतर भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतात आणि पुन्हा वेगळे होतात."
"त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतात. हे काय सुरू आहे, याआधी हे असं कधीही घडलं नव्हतं."
 
नितीन गडकरींच्या भेटीबाबत राजकीय अर्थ काढू नका
काल (18 सप्टेंबर) राज ठाकरे यांनी नितीन गडकरींची भेट घेतली होती. त्याबाबत विचारलं असता राज म्हणाले, गडकरींसोबत झालेल्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. काही नाती या राजकारणापलीकडील असतात. नितीन गडकरी आणि माझे खूप पूर्वीपासूनचे मित्रत्वाचे संबंध आहेत. मी त्यांच्या धोरणावर टीका करू शकतो पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात असं राज ठाकरे म्हणाले.
 
शहराची कार्यकारिणी बरखास्त
राज ठाकरे यांनी नागपूर शहराची मनसेची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. दसऱ्याच्या दिवशी नवी कार्यकारिणी जाहीर होईल. त्यात काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळेल असं राज यांनी सांगितले.
 
राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट
राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.