गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:14 IST)

स्मारक कशासाठी?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुकवर धडाक्यात आगमन केलं. मात्र त्यांनी पहिल्याच पोस्टमध्ये वादग्रस्त विषयाला हात घातलाय आहे.छ.शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला त्यांनी विरोध केला.  निवडणुकांमधील मतांकडे बघून ही स्मारकं उभारली जात आहेत. असा आरोप त्यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबद्दल चकार शब्दही काढला नाही
वाचा काय म्हणतात राज ठाकरे 

स्मारकं कशासाठी... 
महापुरुषांच्या स्मारकांविषयी माझ्या काही कल्पना आहेत. जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मागे बोललो होतो की महाराजांचं खरं स्मारक हे त्यांचे गड किल्ले आहेत, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यातून आत्ताच्या आणि येणाऱ्या पिढयांना स्फूर्ती मिळणं हा त्या स्मारकामागचा उद्देश आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी माझं असंच म्हणणं आहे. निव्वळ राजकारणासाठी आणि दलित मतं मिळावीत म्हणून,केवळ त्यांना खूष करण्यासाठी मुंबईतील जागा डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचा खेळ झाला. तो सगळा प्रकार फक्त निवडणुकीतील मतांकडे बघून होता.

वास्तविक डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक ज्ञानी माणूस, आपल्या अफाट वाचनातून, अभ्यासातून त्यांनी आपल्या देशांत समतेचा एक मोठा विचार दिला. शिका, लढा आणि संघटित व्हा असा संदेश दिला. यांत 'शिका' हे पहिलं आहे जे आपल्याला पुस्तकातूनच मिळू शकतं. आपल्या सर्वांना त्यांचं पुस्तकप्रेम माहित असेलच.

त्यामुळे त्यांचं स्मारक हे ज्ञानाचं केंद्र असावं, तिथे जगभरातले अभ्यासक येऊन त्यांनी त्या पुस्तकांचा लाभ घ्यावा, ज्ञान मिळवावं अशी माझी इच्छा आहे. यातूनच जगाला समजेल की पुस्तकांवर प्रेम करणारे आणि ज्ञानातून समाजाला दिशा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशांत होऊन गेले.

त्यांचं स्मारक म्हणजे भव्य ग्रंथालय असावं जिथे नुसतं गेल्यावर माणसाला वाचनाची, अभ्यासाची प्रेरणा मिळावी. 
महापुरुषाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच त्या स्मारकाचं स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) असावं, भव्यता असावी, त्या वास्तूला एक सौंदर्यदृष्टीचा स्पर्श असावा, माझा महाराष्ट्राविषयी आणि महापुरुषांविषयी असा दृष्टिकोन आहे.