1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सावंतवाडी , गुरूवार, 19 जुलै 2018 (20:22 IST)

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

Rajmata Satvashaldidevi Bhosale
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने सावंतवाडी येथे निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. 
 
राजमाता सत्वशीलादेवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर घरी आणल्यानंतर त्यांचे निधन झाले. 
 
सावंतवाडीतील सांस्कृतिक, कलाक्षेत्रात योगदान
 
मूळच्या बडोदा संस्थानच्या सत्वशिलादेवी यांचा विवाह सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे यांच्याशी विवाह झाला होता. शिवरामराजे भोसले आणि राजमात सत्वशीलादेवी यांनी 1960 च्या दशकात कलेच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्याचे काम केले. सत्वशीलादेवी यांनी स्वत: लाकडी खेळणी बनवण्याची कला आत्मसात केली होती. या कलेच्या माध्यमातून तबके पेले, निरंजन, पूजापाट, उदबत्ती, स्टँडची कमळे, ताम्हने, देव्हारे, दौत आणि कमलदाने, गृहोपयोगी वस्तू तयार होत असत. सावंतवाडीची ओळख अनेक कलावस्तूंचे माहेरघर अशी बनली होती. या कलेला राजाश्रय, तसेच लोकाश्रयामुळे वैभव प्राप्त झाले होते. पुढे रंगीत लाकडी फळे आणि खेळणींना मोठी प्रसिद्धी मिळाली. 
 
1971 मध्ये 'सावंतवाडी लॅकर वेअर्स' या संस्थेच्या माध्यमातून राजमाता सत्वशीलादेवी यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी देशभरातील प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. शिवाय जर्मनी, सिंगापूर अशा देशांमध्येही ही कला पोहोचवली. राजमातांनी स्वत: संशोधनातून या कलाप्रकाराला नवी शैली प्राप्त करून दिली होती.