शनिवार, 6 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (18:06 IST)

देशातील रामभक्तांनी अराजकीय एक समिती तयार करावी - जयंत पाटील

Ram devotees in the country should form a chaotic committee - Jayant Patil
मुंबई  - राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. 
 
राममंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार आणि शिवसेना आणि भाजप यांच्यात बुधवारी झालेल्या हाणामारीचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी वरील आवाहन केले. 
 
दरम्यान या समितीने कायम राममंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा त्रयस्थ बॉडीने निरीक्षणाखाली ठेवावा कारण रामभक्तांकडे रामभक्तांची अपेक्षा आहे की, प्रामाणिकपणे मंदिराचं पावित्र्य राखून राममंदिर उभं राहावं असेही जयंत पाटील म्हणाले. 
 
अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे म्हणून रामभक्त मोठ्याप्रमाणावर निधी देत आहेत. मात्र राममंदिर उभारणीत गोळा होणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे अशी तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
 
राममंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी भाजपचं नाव न घेता यावेळी केली.