मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2022 (09:53 IST)

रश्मी ठाकरे मैदानात; बंडखोरांच्या कुटुंबियांशी भावनिक संवाद

Rashmi Thackeray
शिवसेनेला पडलेले भगदाड पाहून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी या मैदानात उतरल्या आहेत. बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये असून त्यांचे कुटुंब मात्र महाराष्ट्रातच आहे. हीच बाब हेरुन रश्मी ठाकरे यांनी आता या कुटुंबांशी भावनिक संवाद साधायला प्रारंभ केला आहे. परिणामी, बंडखोरांचे मन त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांद्वारे वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील राजकीय संकट वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या इतर आमदारांच्या पत्नींना त्यांच्या पतींशी बोलण्यास सांगण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या काही बंडखोर आमदारांनाही संदेश देत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विविध बैठकांचे सत्र हाती घेतले आहे. त्याचबरोबरीने रश्मी ठाकरे या सुद्धा सक्रीय झाल्या आहेत. शिवसेनेने आणखी काय करायला होते, आजवर काय अन्याय केला, कुठले पद दिले नाही, यासह विविध बाबींवर रश्मी ठाकरे या बंडखोर आमदार पत्नींशी संवाद साधत आहेत. बंडखोरांच्या सुख-दुःखात पक्षाने त्यांना कशी साथ दिली, पूर्वी ते कसे होते आज काय आहेत, कुणामुळे आहेत याचा धांडोळाही या संवादात घेतला जात आहे. भावनिकदृष्ट्या बंडखोरांना वस्तुस्थितीची जाणिव करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी सांगितले की, विधीमंडळ पक्षात बंडखोर गटाकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली आहे. आम्ही आमच्या गटाला शिवसेना (बाळासाहेब) हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांचा विचार आम्ही मानतो. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक घेत असतानाच हा निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबीची दखल शिवसेनेकडून घेतली जात आहे.