मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2022 (09:18 IST)

बंडखोर आमदारांची आता सुप्रिम कोर्टात धाव; ही आहे प्रमुख मागणी

suprime court
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता कायदेशीर लढाईत प्रवेश केला आहे. शिवसेनेतून बंड पुकारलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्विकारले आहे. आणि आता याच बंडखोर आमादारांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंडखोरांनी दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत.

सभागृहात आवश्यक असलेले संख्याबळ हे शिंदे गटाकडे असतानाही विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतापदी नियुक्ती केली आहे. या निर्णयालाच शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकारी उपसभापतींना नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

त्याचबरोबर झिरवाळ यांनी बंडखोर १६ आमदारांना नोटिस बजावली आहे. विधानसभा सदस्य अपात्रतेची ही कारणे दाखवा नोटिस आहे. या नोटिशीला सोमवार म्हणजेच उद्यापर्यंत उत्तर द्यायचे आहे. उपसभापती अशी नोटिस बजावू शकत नाही, अशे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळेच या नोटिशीला गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून गुवाहाटीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये बंडखोर आमदार तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आपली भूमिका न बदलल्याने शिवसेनेच्यावतीने आता या संकटाचा सामना करण्यासाठी कायदेशीर लढाईची तयारी केल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेवर नियंत्रण ठेवण्यावरून उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यातील वाद वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले की, विधानसभा सदस्यत्व सोडावे आणि नव्याने निवडणुकीला सामोरे जावे. त्याचबरोबर ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.