1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 डिसेंबर 2023 (08:11 IST)

रत्नागिरी : दाऊदच्या जमिनीचा होणार लिलाव

daud abrahim
काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या बातमीने चर्चेत आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार आणखी एक दणका देणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथे दाऊदच्या मालकीची जमीन आहे. त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात 5 जानेवारी 2024 रोजी जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे.
 
भारतातून फरार असलेला आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम कासकर हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरीतील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव आहे. दाऊदने तस्करी, खंडणी आणि इतर बेकायदेशीरमार्गाने अमाप संपत्ती जमवली. त्यातून त्याने मुंबईसह विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता दाऊदच्या याच मालकीच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे.
 
रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये चार शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास 20 गुठ्याहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280रुपये इतकी आहे तर दुस-या शेतजमिनीची अंदाजे किंमत 8 लाख8 हजार 770 रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत 21नोव्हेंबरमध्येच नोटीस दिली होती.

Edited by -Ratnadeep Ranshoor