शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2024 (10:46 IST)

रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

RAVINDRA WAIKAR FACEBOOK
शिवसेनेचे मुंबईतील वरिष्ठ नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'वर्षा' निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला.रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईतील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे आमदार आहेत.रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही ठाकरे गटाला फटका बसू शकतो.
 
पक्ष प्रवेशावेळी रवींद्र वायकर म्हणाले, "गेली 50 वर्षे शिवसेनेत काम केलं. बाळासाहेबांबरोबर शिवसेनेचं पडेल ते काम केलं. 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार त्यामुळं बनलो. पण इथं पक्षप्रवेश करण्याचं कारण वेगळं आहे. कोविडमध्ये काही कामं झाली नाही. पण कामं व्हायला पाहिजे आहेत.
 
"प्रामुख्यानं आरेच्या 45 किलोमीटर रस्त्यासाठी 173 कोटी पाहिजे आहेत. लोक आरेतील रस्त्यांसाठी रडत आहेत. तसेच काही भागात पाण्याची व्यवस्था नाही. अशावेळी धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलायला पाहिजे. ते बदलले नाही तर लोकांना न्याया देऊ शकत नाही. पीएमजीपी कॉलनी, सर्वोदय नगर असे अनेक ठिकाणचे प्रश्न आहेत. या सर्वांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही."
 
वायकर पुढे म्हणाले की, "लोक काम करण्यासाठी निवडून देतात. त्यामुळं सध्या देशात मोदींची सत्ता आहे. इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विधानसभेत तातडीनं घेतात. माझी कामंही तातडीनं मंजूर करतील अशी मला आशा आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामुख्यानं इथं आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही. त्यामुळं इथं आलो आहे."
 
ईडी चौकशीच्या प्रश्नावर रवींद्र वायकर म्हणाले की, "यंत्रणांना आम्ही वेळोवेळी सहकार्य केलं आहे. त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल."
 
रवींद्र वायकरांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "वायकरांनी बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शुभेच्छा देतो. बाळासाहेबांच्या 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या विचाराचं पालन आम्ही केलं.
 
"वायकरांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सांगितले आहेत. देशात नरेंद्र मोदींचं विकासाचं पर्व आहे. देशाला जगभरात उच्च स्थानावर त्यांच्या कर्तृत्वानं पोहोचवलं आहे. महायुतीच्या माध्यमातून आपण जे दीड वर्षात निर्णय घेतले त्याचा परिणाम वायकरांवर झाला त्यामुळं विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला."
 
तसंच, "आमच्या काही गैरसमज होता तो आम्ही बसल्यानंतर निघून गेला. तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता. तो दूर झाला. आमदार, खासदारांनी विश्वास ठेवला आहे. दीड वर्षात सर्व वर्गातील लोकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळं लोकांना आपलं सरकार वाटत आहे," असं शिंदे म्हणाले.
 
उत्तर-पश्चिम (वायव्य) मुंबईत येणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात वायकरांची मोठी ताकद असल्याची मानली जाते. त्यात कालच (9 मार्च) उद्धव ठाकरेंनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल कीर्तीकर उमेदवार असतील, असं जाहीर केलं.
 
या घोषणेवरून महाविकास आघाडीतच वादाची ठिणगी पडली आहे. कारण महाविकास आघाडीचं जागावाटप होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांचं नाव कसं जाहीर केलं, असं म्हणत काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय.
 
कोण आहेत रवींद्र वायकर?
मुंबई महानगरपालिकेत रवींद्र वायकर यांनी 20 वर्षं नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुंबईच्या जोगेश्वरी भागातून 1992मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेवर निवडून गेले.
2006-2010 याकाळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं.
त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
2014 ला सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं.
त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.
 
कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप काय आहे?
शिवसेना गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच इडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
 
9 जानेवारी 2023 रोजी ईडीच्या सुमारे 12 अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती. त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता.
 
जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर पंचतारांकित हाॅटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला होता. तसंच 'मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
 
जोगेश्वरी येथे मुंबई महानगरपालिकेचं मैदान आणि उद्यान आहे. मजासवाडी या परिसरात 13 हजार 674 चौरस फुटांची पालिकेची जागा आहे. या जागेवर पालिकेची परवानगी न घेता पंचतारांकित हाॅटेलचं बांधकाम केल्याचा आरोप रविंद्र वायकर यांच्यावरती करण्यात आला. यानंतर या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली. त्यांच्या घरावर छापा टाकला त्या दरम्यान कागदपत्रांची छाननीदेखील करण्यात आली. वायकर यांच्या घरासह इतर सात ठिकाणी ईडीने छापे टाकले होते.
 
29 जानेवारीलाही या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली. यासाठी त्यांनी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. यापूर्वी दोन वेळा त्यांना चौकशीसाठी समन्स देण्यात आला होता.

रवींद्र वायकर यांच्या चौकशीबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. राजकीय सूड भावनेने आकस ठेऊन कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही. नाहीतर तुम्हाला माहिती आहे की कोव्हिडमध्ये किती भ्रष्टाचार केलाय, कोव्हिड बॅगमध्ये पैसे खाल्ले. 300 ग्रॅमची खिचडी 100 ग्रॅम केली."
 
"ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सगळं रेकाॅर्डवरती आहे. मग आम्ही त्यांना कफन चोर म्हणायचं की खिचडी चोर म्हणायचं. त्यामुळे पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नये. भीती कशाला पाहिजे. दूध का दूध होईल. राज्यात एक एक प्रकल्पांचं उद्घाटन होतंय यामुळे त्यांना पोटशूळ उठलेलं आहे," असंही त्यावेळी शिंदे म्हणाले होते.
 
Published By- Priya Dixit