मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (21:19 IST)

नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु

नाशिक जिल्हा पावसाच्या संततधारेमुळे जलमय झाला आहे. आता ११ ते १४ जुलै दरम्यान नाशिकमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवल्यामुळे नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट  देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून  मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक धरण ५० टक्केच्यावर भरल्याने पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नद्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 
 
संततधार पावसामुळे गंगापूर धरण सुमारे ६० ते ६५ टक्के भरले आहे. सकाळपासून धरणातून टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. गोदावरी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड परिसरात असलेले अनेक मंदिरात पाण्याखाली गेले आहेत. तसेच गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्याने या परिसरात राहणाऱ्या लोकांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नदीकाठच्या दुकान आणि घरांना खाली करण्याचे देखील आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी काही अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली तसेच गोदावरी नदीला पूर आला तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनपा प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आहे. 
 
त्र्यंबक आणि इगतपुरीतालुक्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणातपाण्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 10  हजार 35  क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर अहिल्याबाई होळकर पुलाखालून  13 हजार 45 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच दारणा धरणातून  15 हजार 88 क्युसेस, कादवा धरणातून 6 हजार 712 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून  जायकवाडीच्या दिशेने ४९  हजार 480 क्युसेस विसर्ग सुरु आहे. मुकणे, वालदेवी आणि आळंदी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला नाही.
 
धरण              विसर्ग क्युसेक
चणकापूर       23665
पुनद               8829
ठेंगोडा           26900
 
गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून चनकापूर / पुनद धरणातून व ठेंगोडा बंधारा येथे 26900 क्युसेक इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु असुन पावसाचा जोर टिकून राहिल्यास पाण्याची आवक वाढून विसर्ग 30000 क्युसेक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या ठेंगोडा,वासुळ, महाल पाटणे, निंबोळा, चिंचावड, आघार, पाटणे, दाभाडी, टेहरे, चादनपुरी व इतर गावकर्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा
पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने नाशिकला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्याची दखल शिक्षण विभागानेही घेतली आहे.  याबाबत आता नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. धनगर यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाचे प्रमाण पाहता, परिस्थिती अशीच असल्यास, परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा. सुटी दिल्यास नंतर अभ्यास आणि शालेय कामकाजाचे दिवस भरुन घेण्याची दक्षता घेण्यात यावी, असे धनगर यांनी निर्देशित केले आहे. दरम्यान, शहरातील काही शाळांनी सुटी जाहीर केली असून काही शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याचे जाहीर केले आहे.
 
सप्तशृंगी गडावर संरक्षक भिंत कोसळली 
सप्तशृंगी गडावर  दुपारी  देवीच्या मंदिरातील परतीच्या मार्गावरील संरक्षण भिंतीवरून मुसळधार पाऊस सुरु असल्यामूळे खाली उतरणारे सहा भाविक पडल्यामुळे जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. परतीच्या मार्गावरील डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असल्याने पाण्याचा जोर वाढला होता. यासोबतच हे पाणी संरक्षण भितीवरून मोठ्या प्रमाणात वाहु लागले होते. भिंत तुटून मोठ्या प्रमाणात पायरीवर पाणी येऊ लागले. याच वेळी भाविक पाण्याच्या ओघात पन्नास ते साठ पायरीवरून हे भाविक वाहत गेले. अनेक जण जखमी झाले. 
 
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चालू असलेल्या पावसामुळे नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे, त्याच अनुषंगाने मनपा शाळा क्र.१६ गाडगे महाराज ट्रस्ट अमरधाम रोड येथे अडकलेल्या दिव्यांग व्यक्तींचे स्थलांतर  मनपा कर्मचारी करत आहेत.