दसरा मेळाव्यासंदर्भात ते म्हणाले की, गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो, जे नियमात असेल ते आम्ही करू
आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीचं स्वागत केलं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. त्यासोबतच, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यासंदर्भात देखील देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी”, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शिवाजी पार्कवर हा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात काय निर्णय घेतला जाईल, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. “राज्य सरकार नियमाबाहेरचं काहीही करणार नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे.
“एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय काय आहे हे मला माहिती नाही. ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो, जे नियमात असेल ते आम्ही करू”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.