बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (20:14 IST)

सिंधुरत्न योजनेतील निकषांंमध्ये सुधारणा करा! रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेची मागणी

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी उपयुक्त ठरणारी सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना २०२२-२३ ते २०२४ – २५ या तीन वर्षांसाठी लागू केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन. परंतु या योजनेचा लाभ जास्तीतजास्त मच्छीमारांना होण्यासाठी योजनेतील काही निकषांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यावर शासनाने विचार करावा, अशी लेखी मागणी श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष जगदीश खराडे यांनी मत्स्य विभागाकडे केली आहे.
 
आऊटबोर्ड इंजिन खरेदी योजनेत नियमाप्रमाणे मच्छीमार एक इंजिन १० बर्षे बापरल्यानंतर इंजिनचा नवीन प्रस्ताव देऊ शकतो. परंतु गेल्या काही वर्षातील मासेमारीत झालेले बदल पाहता इंजिनचे आयुष्य साधारण सहा ते सात बर्षच येऊ शकते. सतत मासेमारी सुरू असल्यामुळे दिवसातून दोनवेळा मच्छीमारांना समुद्रात जावा लागते.

त्यामुळे इंजिनचे आयुष्य पाच ते सहा वर्षे येते. काही मच्छीमार जुनेच इंजिन वर्षानुवर्षे वापरत आहेत. परंतु सिंधुरत्न योजनेतील १० वर्षांची अट कमी करून साधारण पाच ते सहा वर्षे केली तर गरजू मच्छीमार या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तसेच फायबर नौका, इंजिन व जाळी खरेदीवर ४ लाख अनुदान योजनेत पाच सदस्यांचा गट करून सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु अनुदानाची रक्कम, गटसंख्या पाहता पाचऐवजी दोघांकरीता ही योजना लागू केली तर जास्तीतजास्त मच्छीमार या योजनेचा लाभ निश्चितपणे घेऊन नवीन व्यवसायाची सुरूवात करू शकतील. त्याचप्रमाणे सहा, चार, तीन आणि दोन सिलेंडर यांत्रिक तसेच बिगर यांत्रिक मच्छीमार अशा सर्वच स्तरातील मच्छीमारांना सिंधुरत्न योजनेत जाळी खरेदीवर अनुदान मिळावे, अशी मच्छीमारांची मागणी आहे. तरी मच्छीमारांच्या या सूचनांचा विचार व्हावा, असे खराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor