राजगुरू स्वयंसेवक होते: संघाचा दावा
मुंबई- भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक, शहीद राजगुरू यांच्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दावा केला आहे. राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक होते आणि नागपूरच्या मोहिते वाड्याच्या संघ शाखेची ते संबंधित होते, असा खळबळजनक दावा संघाने माजी प्रचारक, पत्रकार नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता या पुस्तकात हा दावा केला आहे. विशेष म्हणजे हा दावा करताना स्वातंत्र्य लढ्यात संघ सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. या पुस्तकात सहगल यांनी राजगुरू यांच्याशी संबंधित अनेक दावे केले आहेत.
राजगुरू हे संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते. ते नागपूरच्या मोहिते वाड्यातील संघाच्या शाखेचे स्वयंसेवक होते. इंग्रज अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्यावर राजगुरू यांनी लाहोरमधून पलायन केले. त्यानंतर त्यांनी नागपुरात हेडगेवार यांची भेट घेतली होती. हेडगेवार यांनी नागपुरातच राजगुरू यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली होती, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.