शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं - संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचा पत्रकार सुधीर भोंगळे यांनी संपादित केलेला संग्रह प्रकाशित झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाषणादरम्यान राजकीय टोलेबाजी केली.
या संग्रहाचं मुखपृष्ठ भगव्या रंगाचं असल्यानं, तो धागा पकडत संजय राऊत हे पवारांना उद्देशून म्हणाले, "तुमच्या विचारांना भगवं कव्हर घातलं आहे. हे सरकार बेरंग नाही. अवघा रंग एकचि झाला. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आहे, त्याला आपण निर्माण केला आहे, त्याला आपण भगवं कव्हर घातलं."
राऊतांच्या या टोलेबाजीनंतर सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी संजय राऊत यांनी नवी दिल्लीत संसदेबाहेर खासदारांच्या निदर्शनस्थळी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची का आणून दिली, यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ज्यांना तो प्रश्न पडलाय, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
दरम्यान, "भाजपाला देशाचं ऐक्य नको हे शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला 2 वर्षापूर्वी कळलं," असा टोला राऊतांनी पवारांच्या एका भाषणाचा संदर्भ देत भाजपला लगावला.