1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 9 जून 2021 (08:30 IST)

वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे आषाढी वारीसाठी फडणवीसांना साकडे

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरीची पायी वारी करत न आल्याचं दु:ख वारकऱ्यांना झालं आहे. त्यामुळे, यंदा तरी वारी होणार का नाही, असा सवाल अनेकांना पडलाय. त्यातच, नेहमीप्रमाणे दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर वारकरी मंडळाने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
 
कोरोनाची दुसरी लाट यंदा खूपच घातक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंनी प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे. मात्र, काही वारकरी मंडळींकडून निमयावली आखून वारी होऊ द्यावी, असा आग्रह धरण्यात येत आहे.
 
पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्‍यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सोशल मीडियातून सांगितले आहे.
 
कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव वारकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.