गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (12:14 IST)

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांचा 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र सरकारनं मागण्या त्वरित मान्य न केल्यास 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 26 तारखेपासून पूर्णपणे अन्नत्याग करणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना नियुक्ताय द्यायला काय हरकत आहे?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदतले मुद्दे
राज्य सरकारच्या काही मुद्द्यांच्या विरोधात मी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला, असं संभाजीराजेंना जाहीर केलं आहे.
 
त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे असे आहेत.
 
सारथी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावं.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकारच रक्कम देत नाही, संचालक मंडळ नाही. कर्ज परतावे काढत नसल्यानं बँका यापुढं कर्ज मंजूर करणार नाहीत.
वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. केवळ आश्वासनं दिली आहेत. अनेक वसतीगृहांचे प्रस्ताव आहेत पण ते प्रलंबित आहेत.
कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली, त्यावर पुढील कारवाई कधी होणार?
आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी प्रलंबितच आहे.
राज्य सरकारनं वरील मुद्दे त्वरित सोडवले नाहीत, तर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार. पूर्णपणे अन्नत्याग करणार. आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषण करणार, असा इशारा यावेळी संभाजीराजेंनी दिला आहे.
 
सरकारनं वरील मागण्या मान्य कराव्या ही सरकारला विनंती आहे, असंही त्यांनी म्हटलंय.