गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (21:32 IST)

समीर वानखेडे यांची ४ तास चौकशी, चौकशीसाठी दिल्लीतून ५ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानकडे २५ कोटी रुपये खंडणी मागितली असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी आणि समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून ५ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. या टीमकडून समीर वानखेडे यांची ४ तास चौकशी करण्यात आली आहे. पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांनी सोशल मीडियावर वानखेडेंवर आरोप केले आहेत.
 
एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांच्या चौकशीची माहिती दिली आहे. या प्रकऱणात पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावीचा जबाब नोंदवण्यासाठी एनसीबीने त्यांना नोटीस पाठवली होती. परंतु त्यांना ती नोटीस मिळाली नाही. यामुळे मीडियाच्या माध्यमातून त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रभाकर साईल याने सोशल मीडियावर २५ कोटी खंडणी मागितील्याचे आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर माहिती द्यावी असे आवाहन एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी केलं आहे.
 
समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्याबाबत चौकशी टीम निर्णय घेईल. प्रभाकर साईलने पत्राद्वारे सोशल मीडियावर आरोप केले होते. या आरोपांच्या आधारावर चौकशी टीम गठीत कऱण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली परंतु पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावीची चौकशी होणे बाकी आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर साईलने चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात हजर राहावे असे आवाहन ज्ञानेश्वर सिंह यांनी केलं आहे.