1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (08:18 IST)

समृद्धी महामार्गः नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा पूर्ण; कधी खुला होणार?

Samrudhi Highway: Nagpur to Shirdi first phase completed; When will it open? समृद्धी महामार्गः नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा पूर्ण; कधी खुला होणार?Maharashtra Regional News In Webdunia Marathi
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

या महामार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्याचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री श्री. शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला, याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल.
 
या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर ८ ओव्हरपास आणि ७६ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील मंत्री श्री. शिंदे यांनी आज पाहणी केली. तसेच वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स देखील बसवण्यात येणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपास वरून वन्यजीवांनी ये जा सुरू केली असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्यांची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत.
 
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या ‘ऑटो कार इंडिया’ या वाहन उद्योगातील अग्रगण्य मासिकाच्या टीमने समृद्धी महामार्गावर येऊन आज विशेष भाग चित्रित केला. त्यासोबतच या महामार्गावर फेरारी, लॅमबोर्गनी, मर्सिडीज यांच्या सुपरकार्सच्या विशेष रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन श्री. शिंदे आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मासिकाच्या टीमने केलेल्या विनंतीवरून मर्सिडीजच्या नव्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडीचे सारथ्य करून या रस्त्यावरून श्री. शिंदे यांनी फेरफटका मारला.यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आणि एमएसआरडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.