शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (17:26 IST)

संजय राठोड : देवेंद्र फडणवीसांकडून पूजा चव्हाण प्रकरणी आरोप आणि आता मंत्रिपद

पूजा चव्हाण या तरूणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोप झालेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता मात्र त्यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
 
पण पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिनचिट दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराआधी नवी दिल्लीतल्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तर संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही त्यांच्याविरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.
 
संजय राठोडांना पोलिसांची क्लीन चीट- एकनाथ शिंदे
दरम्यान संजय राठोड यांना पोलिसांनी क्लिन चिट दिल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा केला आहे.
 
"कोणाचं काय मत असेल तर ऐकून घेतलं जाईल. लोकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी तपास केला आहे. त्यांना क्लीन चीट दिली आहे म्हणून त्यांचा समावेश केला आहे. याउपर कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
 
पूजा चव्हाण प्रकरण काय आहे?
मूळची बीडमधील परळी येथील असलेली ही 22 वर्षीय तरूणी फेबुवारी 2021च्या पहिल्या आठवड्यात पुण्यात आली होती. पुण्यातील वानवडी भागात एका सोसायटीत ती राहत होती. पण 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घराच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे.
 
त्यावेळी सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती आत्महत्या करणार आहे तुम्ही तिला समजावून सांगा असे म्हणत होती. तर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर अरुण नावाचा एक कार्यकर्ता त्या तरुणीच्या मृतदेहाजवळ होता. त्यावेळी कथित मंत्र्याने त्या तरुणीचा मोबाईल ताब्यात घेण्यास सांगितल्याचं दुसऱ्या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं होतं.
 
कर्जाच्या तणावातून पूजाने आत्महत्या केली असून आपली याबाबत काहीच तक्रार नसल्याचं तिच्या आई-वडिलांनी म्हटलं होतं. पण पूजाच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं होतं.
 
पूजा चव्हाणच्या मृत्यूचा थेट संबंध तत्कालिन ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्याशी असल्याचं सांगत भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
 
पूजाच्या आई-वडिलांवर दबाव टाकण्यात येत असून पोलिसांनी स्यू मोटो अंतर्गत स्वतःच याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करावा, संजय राठोड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी (25 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केली होती.
 
त्यानंतर पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनीही गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारं पत्र वानवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना लिहिलं होतं.
 
फडणवीसांनी केली होती चौकशीची मागणी
"पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता.
 
शिवाय "पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी," अशी मागणी तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
"संबंधित तरुणीचे प्रेमसंबंध एका मंत्र्यांशी असल्याच्या क्लिप सोशल मीडियावर फिरत असल्याचं समजलं आहे. एका तरुणीचा मृत्यू आणि त्याभोवती निर्माण झालेले संशयाचं वर्तुळ पाहता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी करु नये, त्यातील सत्य तात्काळ समोर आलं पाहिजे," असंही फडणवीस म्हणाले होतं.
 
कोण आहेत संजय राठोड?
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
 
संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.
 
शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 
त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.
 
अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.
 
2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
 
राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढे होतं. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली होती.
 
यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.