शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (16:05 IST)

संजय राऊत अडचणीत? महिलेच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाचे चौकशीचे आदेश

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून आपला पाठलाग आणि छळ केला अशी एका महिलेनी तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
 
मुंबईतील एका 36 वर्षीय महिलेने केलेल्या आरोपांबाबत संजय राऊत किंवा त्यांच्या वकिलांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
मंगळवारी (22 जून) मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. ए. जमादार यांच्यापुढे या तक्रारदार महिलेच्या याचिकेवर सुनावणी झाली.
 
 
कोर्टात काय झालं?
संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार केल्यामुळे आपल्याविरोधात सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेनी केला आहे.
 
संबंधित महिला एका प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. या महिलेला बनावट पदवी प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आता जामीन मिळाला आहे.
 
या महिलेनी असा आरोप केला आहे की "मी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार केल्यामुळे मला बनावट पदवी प्रकरणात गोवण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या दबावामुळे पोलिसांनी हे कृत्य केले."
 
कोर्टाने याची दखल घेत पोलीस आयुक्तांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले.
कोर्टाने आदेशात म्हटलं, "मुंबई पोलीस आयुक्तांनी याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर योग्य चौकशी करून कारवाई करावी. पोलीस आयुक्तांनी रिपोर्ट 24 जूनला (उद्या) कोर्टात सादर करावा."
 
तक्रारदार महिलेच्या वकील आभा सिंह यांनी बीबीसीला सांगितले की, "संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर, तक्रारदार महिलेला मुंबई पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात 8 जूनला अटक करण्यात आली होती."
 
 
संजय राऊतांवर महिलेचा आरोप काय?
हायकोर्टात दाखल याचिकेत तक्रारदार महिलेने सांगितले की त्यांना 2013 ते 2018 या काळात पाठलाग करू जिवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन FIR चा तपास करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आलीये.
 
पाठलाग आणि जिवे मारण्याच्या प्रयत्नामागे संजय राऊत यांचा हात आहे, असा आरोप या महिलेने केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही पोलिसांनी काही कारवाई केली नाही, असं या महिलेने आपल्या याचिकेत कोर्टाला सांगितलं आहे.
 
संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकेमार्फत करण्यात आली आहे.
 
 
संजय राऊत यांच्याकडून प्रतिक्रिया नाही
हायकोर्टाच्या आदेशावर शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या वकिलांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
 
पीटीआयच्या माहितीनुसार, "मार्च महिन्यात कोर्टात झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते."