1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2023 (16:04 IST)

निवडणूक आयोगाला बोललेले अपशब्द मागे घेणार नाही- संजय राऊत

sanjay raut
'मी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलेलं नाही. हक्कभंगाच्या चौकशीसाठी बोलावलं तर मी तयार आहे,' असं म्हणत 'सामना'चे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी सर्व वादावर भाष्य केलं.त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम, उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रीय राजकारणातले ध्येय , राजकारणातील घसरत चाललेली भाषा अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं त्यांनी दिली.
 
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही चर्चेत आहात. मागच्या आठवड्यात तुम्ही विधीमंडळाला चोरमंडळ म्हणालात. त्यावरून तुमच्यावर हक्कभंगही दाखल करण्यात आला आहे. तुम्ही ते चुकून म्हणालात की तुम्ही आजही तुमच्या शब्दांवर ठाम आहात?
 
मी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलेलं नाही. विधीमंडळ हे कायदेमंडळ आहे. मी गेली अनेक वर्ष राज्यसभेचा सदस्य आहे. ते तर सर्वोच्च कायदेमंडळ आहे.
 
महाराष्ट्राच्या विधीमंडळातून मी राज्यसभेवर निवडून जातो. मग मी विधीमंडळाला चोरमंडळ कसं म्हणेन?
 
विधीमंडळात शिवसेनेतून चोरासारखा फुटून गेला, ज्यांनी शिवसेना हे नाव आणि चिन्ह चोरलं त्या गटाचा उल्लेख मी चोरमंडळ केला.
 
हे जर अर्थाचा अनर्थ करत असतील तर भविष्यात मी त्याला उत्तर देईन.
तुम्हाला हक्कभंगाची नोटीस आली का? तुम्ही विधीमंडळात चौकशीसाठी उपस्थित राहणार?
 
विधीमंडळाविषयी मला अतिशय आदर आहे. जर त्यांना माझ्याकडून काही खुलासा हवा असेल तर निश्चितपणे मी देईन. त्यांना मला बोलवायचं असेल तरी मी उपस्थित राहीन. शेवटी तेही एक छोटं कायदेमंडळ आहे.
 
तुम्ही निवडणूक आयोगाबाबातही दोन दिवसांपूर्वी अपशब्द वापरले. त्याचबरोबर आज रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंबाबत खालच्या पातळीची भाषा वापरली. तुम्हाला असं नाही वाटत का राजकारणात भाषेची पातळी घसरत चालली आहे.
 
निवडणूक आयोगाला म्हटलं मी ***. ते चुकून वगैरे काही झालेलं नाहीये. हा एक संताप आहे. ज्या पध्दतीचा निकाल त्यांनी घटनाबाह्य पध्दतीने दिला. ही सरळसरळ लफंगेगिरी आहे. चाळीस आमदार पक्षातून सोडून गेले म्हणून पक्ष त्यांचा होत नाही.
 
विधीमंडळातील फूट आम्ही मान्य करतो. पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही त्यांच्या मालकीची कशी करू शकता? त्यामुळे हा निर्णय राजकीय दबावापोटी देण्यात आला आहे. निवडणूक आयोग जर असे निर्णय देऊ लागला तर लोकशाहीसाठी ते योग्य नाही. त्यामुळे अशा लोकांची पूजा ही खेटराने करायला हवी.
 
भाषेच्या पातळीबद्दल बोलायचं झालं तर तर महाराष्ट्रात असं होऊ नये. पण भाजपकडून ज्या पध्दतीचं राजकारण केलं जात आहे , त्यामुळे वातावरण गढूळ झालं आहे. ही संतापाची ठिणगी आहे.
 
म्हणून अशी भाषा वापरणं हा पर्याय आहे?
 
मी असंसदीय भाषा वापरत नाही. माझ्याकडून दोन ते तीन वेळा हे शब्द गेले असतील. पण मी गेल्या चाळीस वर्षांपासून पत्रकारिता आणि राजकारणात आहे.
 
मी सर्रास असं बोलत नाही. एकदा दोनदा बोललो म्हणून तुम्ही माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. निवडणूक आयोगाला मी बोललो. ते शब्द मी मागे घेणार नाही.
 
पण याआधी तुम्ही म्हणालात तुमचा निकालावर विश्वास आहे. पण निकाल तुमच्या विरोधात गेल्यावर तुम्ही निवडणूक आयोगावर टीका करताय?
 
निवडणूक आयोगाने जर पक्षपातीपणे निर्णय घेतला. निकाल हा शिवसेनेच्याच बाजूने लागायला हवा. पण सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आम्ही म्हणतोय की, तो आशेचा शेवटचा किरण आहे. आम्ही त्याबाबतीत आशावादी आहोत.
तुमच्यावर सतत आरोप होतात, तुम्ही शिवसेनेची वाट लावली. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला लांब ठेवलं पाहीजे. शिवसेना फुटण्याला तुम्ही जबाबदार आहात. हे आरोप तुमच्यावर का केले जातात?
 
मी त्यांना 50 खोके दिले नव्हते. ते का फुटले हे सर्वांना माहिती आहे. त्यांची फुटण्याची कारणं रोज बदलतात.
 
कधी म्हणतात, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेली म्हणून फुटलो, कधी म्हणतात कॉंग्रेसबरोबर गेलो म्हणून फुटलो. कधी म्हणतात, निधी मिळत नव्हता.
 
काल गुलाबराब पाटील म्हणाले, मराठा मुख्यमंत्री करायचा होता म्हणून फुटलो. त्यांनी त्यांची कारणं ठरवावीत.
 
जेव्हा हे बंड झालं तेव्हा उद्धव ठाकरेंनी तुमचं ऐकलं. नेमकं काय घडलं होतं. सर्वात आधी मोजके आमदार गेले होते. त्यानंतर काहींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा असं सांगितलं पण तुम्ही म्हणालात ज्यांना जायचं त्यांना जाऊ दे. तुमच्यामुळे ही फूट वाढत गेली असा एक आरोप होतो. हे कितपत खरं आहे?
 
पक्षप्रमुख निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. मी काही कोणाला सांगितलं नव्हतं. या लोकांनी पैसे घेऊन स्वतःचा आत्मा विकला होता. लिलावात उभं केलं होतं. तिथे मला आणि उद्धवजींना दोष का द्यायचा?
 
तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्यासंदर्भात विरोधकांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. तुम्हाला वाटतं का त्याचा काही उपयोग होईल?
 
मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. जर झाला असता तर लालूप्रसाद यादव यांच्या घरावर आज छापे पडले नसते. तपास यंत्रणाचा गैरवापर ज्या पध्दतीने सुरू आहे, त्याविरोधात या देशात मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.
या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांचं काम कसं आहे असं तुम्हाला वाटतं?
 
काम तर अजून दिसत नाहीये. पण या सरकारमध्ये तो एकच शहाणा माणूस वाटतो मला. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. विरोधीपक्ष नेते म्हणून काम केलं आहे. पण त्यांचे हात आता दगडाखाली अडकलेले आहेत. विचित्र संगतीमध्ये ते अडकलेले आहेत.
 
उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर टीका केली गेली की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि त्यांना मुस्लिम समुदायाचा पुळका आला.
 
सभेला जे लोक जमले होते ते कोण होते? मुस्लिम समाज हा काही परका आहे का? मग मोदी मशिदीत का जात आहेत? मुस्लिम समाजाला आपलसं करा असं का सांगत आहेत? महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा मराठी भाषिक आहे. या भारताचा नागरिक आहे.
 
गैरकृत्य करणारा समाज हा प्रत्येक धर्मात आहे. तुम्ही जर एखाद्या समाजाला टार्गेट करणार असाल तर या देशाची शकल होतील. भाजपला असेच दंगे करून राजकारण करायचं आहे शिवसेना ते होऊ देणार नाही.
 
उद्धव ठाकरे आणि तुमच्या पक्षाची दिशा आता कशी असणार आहे? सध्या राष्ट्रीय नेते उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत...
 
पक्ष हा योग्य दिशेने काम करत आहे. आताची फेज ही तात्पुरती आहे. निवडणुका घ्या, त्यासाठी आम्ही तयार आहोत. कसब्यात जे दिसलं तेच संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल. उद्धवजी हे राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका भविष्यात बजावतील. त्यांची इच्छा आहे सर्व विरोधकांनी एका छताखाली यावं. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
 
Published By- Priya Dixit