सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 9 मे 2023 (09:39 IST)

संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीत ठिणगी? त्यांच्या विधानांमुळे आघाडीला तडा?

sanjay raut
2019 निवडणुकांनंतर शिवसेना-भाजप वेगळे होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार हे स्पष्ट झालं. मंथनानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली.
 
महाविकास आघाडी प्रत्यक्ष साकारण्यात शिवसेना खासदार संजय राऊतांची भूमिका निर्णायक होती. शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते तसंच 'सामना'चे संपादक असलेल्या राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर देतानाच तिन्ही पक्षात समन्वयाचं काम केलं होतं.
 
मात्र आता संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीतच सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांनी 'सामना'चे अग्रलेख, रोखठोक हे सदर तसंच प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे.
 
सोमवारी (8 मे) 'सामना'चा अंक प्रसिद्ध झाला आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा वादाचा नवा अंक पाहायला मिळाला.
 
'पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!' या नावाने अग्रलेख होता.
 
सामनाच्या अग्रलेखात लिहिलं, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची पवारांनी घोषणा करताच खळबळ माजणे साहजिक होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष."
 
या लेखात पुढे म्हटलं आहे, "पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी असा स्वतंत्र पक्ष उभा केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रात असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे ते महाराष्ट्रातच."
 
"पवार हे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येकजण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरुन गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार पाच दिवस चाललेल्या नाट्यावर पडदा पडला."
 
महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित-पवार
सामनातल्या अग्रलेखाबद्दव शरद पवार यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी म्हटलं की,“सामनातील अग्रलेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो वाचल्यावर मी मत व्यक्त करेन. सामना किंवा त्याचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करणं योग्य होईल. नाही तर उगाच गैरसमज होतात.
 
माझी खात्री आहे की, त्यांची भूमिका महाविकास आघाडीच्या ऐक्याला पोषक असेल.”
 
महाविकासआघाडीत सर्व व्यवस्थित आहे. त्याची काळजी करण्याचं कारण नाही, असंही पवारांनी नमूद केलं.
 
'सामना'मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात राऊतांनी भाष्य केलं होतं.
 
'इतकं लक्ष त्यांनी शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं तर...'
दरम्यान शरद पवार आणि भावी नेतृत्व यासंदर्भातील अग्रलेखावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
 
त्यांनी म्हटलं, "संजय राऊतांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे, त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. संजय राऊतांचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवारांचं राजकारण आहे. काय माहिती ते (संजय राऊत) कोणाकोणाच्या घरात गेले होते, कोणाकोणाच्या बॅगा त्यांनी तपासल्या हे त्यांनाच माहिती."
 
"इतकं लक्ष त्यांनी शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं, त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर आज आपल्याला बाहेर बसावं लागलं नसतं, आजची परिस्थिती आली नसती", असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हाणला.
 
संजय राऊत विरुद्ध अजित पवार
शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक असलेले संजय राऊत यांनी रविवारी आपल्या 'रोखठोक' सदरामध्ये ‘लोकशाहीची धूळधाण, फोडाफोडीचा सिझन-2’ नामक एक लेख लिहिला होता.
 
‘शिंदे गटाचे 16 आमदार बाद होतील, त्याची भरपाई म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले जातील. अजित पवारांसापासून हसन मुश्रीफांपर्यंत ईडीचा ससेमिरा लावला गेला आहे. त्याचा शेवट काय होणार, ही फेक न्यूज आहे की आणखी काही हे सत्य कसे शोधायचे,’ असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता.
 
यानंतर दोन दिवस अजित पवार यांच्या कथित बंडाबाबत जोरदार चर्चा आणि बातम्या माध्यमांमध्ये सुरू होत्या.
 
पुढच्या दिवशी स्वतः अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण अखेरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं सांगितलं.
 
याचवेळी अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. राऊत यांचा ‘सामना’ शिवसेनेचं मुखपत्र आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्याच पक्षाविषयी बोलावं. आमच्या पक्षाचं वकीलपत्र कुणी घेऊ नये, असा सज्जड दम अजित पवारांनी त्यावेळी भरला होता.
 
सामना नेहमी सत्य लिहितो – संजय राऊत
अजित पवार यांनी दम भरल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. मी केवळ शरद पवारांचंच ऐकतो असं ते म्हणाले.
 
राऊत पुढे म्हणाले, “जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. मला जरी कोणी टार्गेट करत असेल तरी मी सत्यच बोलणार. मी कदापी मागे हटणार नाही. सामना नेहमी सत्य लिहितो. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ किंवा जितेंद्र आव्हाड अशी किती जणांची नावं आहेत की त्यांच्यावर यंत्रणांचा दबाव आहे.
 
“जे सत्य आहे ते मी लिहित राहणार आणि बोलतच राहणार असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. हे सत्य आहे की असत्य आहे अजित पवार यांनी सांगायला पाहिजे. या सर्व बातम्यांची मी माहिती ठेवतो यामध्ये गैर काय? मी लिहिलेलं टोकदार सत्य जर कोणाला टोचत असेल तर मी काय करु,” असंही राऊत यांनी म्हटलं.
 
कोण संजय राऊत? – अजित पवार
यानंतर अजित पवार यांना आज (21 एप्रिल) सकाळी पुन्हा यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पवार यांनी चक्क कोण संजय राऊत, असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत यांना दुर्लक्षित केलं.
 
ते म्हणाले, “माझ्याबाबत पसरवण्यात आलेल्या बातम्यांबाबत मी बोललो आहे. त्यात कुणाचंही नाव घेतलेलं नाही. मी आणि माझा पक्ष याबाबत बोललो. त्यामुळे कुणाला लागायचं काहीच कारण नाही.
 
“मी बोलताना कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. तरीदेखील काहीजण अंगावर ओढवून घेतात,” असा टोला पवार यांनी यावेळी लगावला होता.
 
यानंतर यासंदर्भात संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
 
अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो, असं राऊत त्यांच्याबाबत म्हणाले.
 
तीन दिवसांपूर्वीच आम्ही एकत्र जेवलो, आता पुन्हा एकत्र जेऊ. अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत. आमच्यात फूट पाडण्याचा हा भाजपचा डाव आहे, आम्ही हा डाव हाणून पाडू, असंही राऊत म्हणाले.
 
शरद पवार काय करणार?
"राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला.
 
पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय"?
 
सामनाच्या 4 मे रोजीच्या अग्रलेखात ही भूमिका मांडण्यात आली.
 
अजित पवार वारंवार सांगतायत की मी कुठेही जाणार नाही. अजित पवारांविषयीच्या या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. पवार कुटुंबात एक नातं आहे. पण राजकारण वेगळं असतं. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही
 
शरद पवार, बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधी ही या देशातली टोलेजंग व्यक्तिमत्त्वं आहेत. त्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या घरातून जेव्हा कुणी पुढे येतं, तेव्हा त्यांना ती उंची गाठता येत नाही. कारण ते एवढे महान व्यक्तीमत्व असतात. आपण त्यांची तुलना त्यांच्या वडिलांशी करतो हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंशी तुलना होऊच शकत नाही. अजित पवार महाराष्ट्रात स्थिर आहेत. सुप्रिया सुळे दिल्लीत चांगलं काम करत आहेत. पण संसदेतली कामगिरी आणि राष्ट्रीय पक्षाचं प्रमुखपद स्वीकारल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलणं यात जमीन-आसमानाचा फरक असतो, असं राऊत म्हणाले.
 
राऊतांनी चोंबडेपणा करु नये
शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सध्या सुरू होती.
 
यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले होते. त्यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
 
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, काँग्रेसमध्येही अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत. पण त्यांचा पक्ष सोनिया गांधींकडे बघून चालतोय. त्यामुळे राष्ट्रवादीत अध्यक्ष कुणीही झालं, तरी शरद पवार पक्षाचे सर्वोसर्वा राहतील, त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही.
 
यावर चिडलेल्या नाना पटोलेंनी राऊत यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली होती. "ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी बंद केली पाहिजे. आम्ही वारंवार सांगितलंय की आमच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत नाहीत.
 
उद्या उद्धव ठाकरे नसून संजय राऊत निर्णय घेतात असं म्हणणार का? खर्गे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे. अशा व्यक्तीचा असा अपमान करण्याचं काम संजय राऊत करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही", असं नाना म्हणाले होते.
 
याला संजय राऊतांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, "ते नाना पटोले आहेत. काय एवढं गांभीर्यानं घेताय त्या माणसाला? त्यांचा पक्ष त्यांना गंभीर्यानं घेत नाही. मी राहुल गांधींशी यावर चर्चा करेन. त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी बोलतात".
 
‘लोक माझा सांगाती’ या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथनपर पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यात आले. ठाकरे दोनच दिवस मंत्रालयात आले. त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेता राजीनामा दिला.
 
काहीशी बोचणारी अशी ही टीका होती. या टीकेला 'सामना'तून उत्तर दिलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: प्रत्युत्तर देण्याऐवजी सामनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर, पक्षावर टीका केली जात आहे, असं लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं सरकार असताना दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत असत. त्यावेळी सरकारमध्ये फूट पडणार असं वाटत असे. पण त्या टीकेचा सरकारवर परिणाम होत नसे. भाजपविरोधात उभं राहण्यासाठी महाविकास आघाडी असणं ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची अपरिहार्यता आहे.
 
संजय राऊत जे बोलत आहेत किंवा लिहित आहेत त्याने महाविकास आघाडीत फूट पडेल असं वाटत नाही. राऊत यांच्या बोलण्याचा-लिखाणाचा परिणाम नक्कीच होऊ शकतो पण मविआ आघाडी तुटेल ही शक्यता धूसर आहे," असं ते म्हणाले.
 
"राऊतांच्या लिखाणाने, बोलण्याने मनं कलुषित होऊ शकतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अढी निर्माण होऊ शकते, असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना वाटतं.
 
"राऊत यांच्या बोलण्याने-लिहिण्याने ठिणगी पडते आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासंदर्भात असंतोष आहे. राऊत 'सामना' वृत्तपत्राचे संपादक आहेत आणि त्याचवेळी खासदारही आहेत. बातम्या-लेखातून असंतोष वाढवण्याचं काम ते करू शकतात. त्याचवेळी राजकीय नेते म्हणून मनं घट्टही करू शकतात," असं सुधीर सूर्यवंशी यांनी सांगितलं.
 
"राऊत यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दुखावले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी मविआ आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेता राजीनामा दिल्याने शरद पवारांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला धक्का बसला आहे. भाजपविरोधात पक्षांची मोट बांधण्याचं काम पवारांच्या नेतृत्वात झालं होतं. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही हेच प्रारुप यशस्वी झालं होतं. केंद्रीय पातळीवरही याच धर्तीवर आघाडी उभारण्याचा प्रयत्न होता. पण या सगळ्याला खीळ बसली. म्हणूनच पवारांनी आपली खंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडली," असं सूर्यवंशी म्हणाले.
 
"उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती आहे पण त्यांना पायाभूत पातळीवर संघटनात्मक ढाचा लागणार आहे. तो त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच मिळू शकतो. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे राऊत यांनी सामंजस्याची भूमिका त्यांनी घ्यायला हवी," असं सूर्यवंशी म्हणाले.
Published By -Smita Joshi