सप्तशृंगी गडावर देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडून सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, आमदार छगन भुजबळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिपीका चव्हाण, पंकज भुजबळ, राहुल आहेर, नरेंद्र दराडे, बाळासाहेब सानप, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरींग दोरजे, सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टच्या अध्यक्षा यु. एन. नंदेश्वर आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, देशात आर्थिक पर्यटनाला अधिक महत्व आहे त्यामुळे तीर्थस्थळांचा विचार करतांना भाविकांना चांगल्या सुविधा पुरविल्या तर तेवढीच चांगली अर्थव्यवस्था उभी रहाते. फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध झाल्याने गडाच्या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले, देवीच्या शक्तीपीठाकडे जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशातील पहिला प्रयोग या ठिकाणी करण्यात आला आहे. इथल्या सुविधा जागतिक दर्जाच्या असून जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना आईचे दर्शन सहजपणे घेता येईल. गडावरील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.