बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (08:40 IST)

कोरोना संसर्गामुळे यंदा सारंगखेडा यात्रा होणार नाही

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. दत्त जयंतीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून आवश्यक व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. त्यामुळे शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच सारंगखेडा यात्रा रद्द करण्यात आली आहे. सारंगखेडा यात्रेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 
 
डॉ.भारुड म्हणाले,  पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादीत राहील आणि शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. मंदिरात पारंपरिक विधी आणि भाविकांचे दर्शन सुरू राहील. मंदिर परिसरात केवळ ५० व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा. इतर भाविकांना टप्प्याटप्प्याने तेथे आणण्याची व्यवस्था करावी. भाविकांनां योग्य रांगेत उभे रहाण्यासाठी खूणा करण्यात याव्यात.
 
रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. दत्त जयंतीच्या दिवशी गरजेनुसार स्थानिक प्रशासनाने एक किंवा दोन तास वेळेत वाढ करावी. आरोग्य विभागाने मंदिर परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करावे आणि थर्मल स्कॅनरची व्यवस्था करावी. ग्रामपंचायतीने  दोन ठिकाणी साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी. फुले आणि नारळाच्या दुकानांची संख्या मर्यादीत ठेवावी व अशा दुकानांची माहिती पोलीसांना द्यावी. निवडणूक आचारसंहितेचे सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.